जळगाव जिल्ह्यातील एरंडोल तालुक्यातील वरखेडी गावात शेतात काम करत असताना विजेचा शॉक बसल्याने एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू झाला. दीड वर्षांची बालिका बचावली.
जळगाव (एरंडोल तालुका) : जळगाव जिल्ह्यातील एरंडोल तालुक्यातील वरखेडी गावात एक अत्यंत हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. शेतात काम करत असताना विजेचा शॉक बसल्याने एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू झाला असून, या दुर्घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. या घटनेत दीड वर्षांची एक बालिका चमत्कारिकरित्या बचावली आहे. ही घटना आज दुपारी सुमारे १२.३० वाजेच्या सुमारास घडली. शेतातील पिकांचे वन्यप्राण्यांपासून संरक्षण व्हावे यासाठी शेतकऱ्याने तारांचे कुंपण उभारून त्यात वीज प्रवाहित केली होती. दुर्दैवाने, शेतात मजुरीसाठी आलेल्या एका कुटुंबातील सदस्य त्या तारांच्या संपर्काElectric Shockत आल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.
मृतांची नावे
विकास रामलाल पावरा (वय ३५)
सुमन विकास पावरा (वय ३०) – पत्नी
पवन विकास पावरा – मुलगा
कंवल विकास पावरा – मुलगा
अजून नाव निष्पन्न नसलेली वृद्ध महिला (आजी)
या दुर्घटनेत दुर्गा विकास पावरा (वय दीड वर्षे) हिचा मात्र थोडक्यात जीव वाचला आहे. सर्व मृत मध्य प्रदेशातील असून, कामासाठी वरखेडी येथे आले होते. मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात हलविण्यात आले आहेत.
शेतमालकावर गुन्हा दाखल करण्याची तयारी
या प्रकरणात शेतमालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. घटनास्थळी पोलीस दाखल होऊन पंचनामा व इतर कायदेशीर प्रक्रिया पार पाडली जात आहे.
परिसरात शोककळा
एकाच कुटुंबातील पाच जणांचा असा दुर्दैवी अंत झाल्याने वरखेडी गावासह संपूर्ण जळगाव जिल्ह्यात शोककळा पसरली आहे. गावकरी आणि नातेवाईकांनी या घटनेने गहिवरून शोक व्यक्त केला आहे.


