IFS Officer Shares Viral Video of Venomous Banded Krait Snake : रात्रीच्या गस्तीदरम्यान, IFS अधिकारी परवीन कासवान यांना एक अत्यंत विषारी बँडेड क्रेट (Banded Krait) साप दिसला.
IFS Officer Shares Viral Video of Venomous Banded Krait Snake : रात्रीच्या गस्तीदरम्यान दिसलेल्या अत्यंत विषारी सापाचा व्हिडिओ एका IFS अधिकाऱ्याने शेअर केला आहे. सोशल मीडियावर, विशेषतः एक्सवर (X) सक्रिय असलेले IFS अधिकारी परवीन कासवान यांनी अंधारात पाण्यातून वेगाने पुढे सरकणाऱ्या बँडेड क्रेट (Banded Krait) सापाचा व्हिडिओ शेअर केला आहे. टॉर्चच्या प्रकाशात त्याचे काळे आणि पिवळे पट्टे अगदी स्पष्ट दिसत आहेत. हा व्हिडिओ, विशेषतः सापाचा काळा आणि पिवळा रंग, लगेचच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला.
काळे आणि पिवळे पट्टे
'ते सुंदर पट्टे. बँडेड क्रेट हा भारतात आढळणारा अत्यंत विषारी साप आहे. रात्रीच्या गस्तीदरम्यान तो अचानक दिसला. निसर्गाने त्यांना इतके वेगळे पट्टे कसे दिले असतील!!' व्हिडिओ शेअर करताना परवीन कासवान यांनी विचारले. कॅप्शन आणि व्हिडिओने खूप लवकर प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले. एका दिवसात हा व्हिडिओ साडेतीन लाखांहून अधिक लोकांनी पाहिला. बँडेड क्रेट हा भारतातील सर्वात विषारी सापांपैकी एक आहे आणि तो सामान्यतः रात्रीच्या वेळी शिकारीसाठी बाहेर पडतो. तरीही, बँडेड क्रेट दिसल्याच्या घटना दुर्मिळच आहेत. सापाचा अनोखा नमुना आणि रंगाने सोशल मीडिया वापरकर्त्यांना आश्चर्यचकित केले.
निसर्गाची किमया
एका दर्शकाने शंका व्यक्त केली की, 'तुम्हाला खात्री आहे का की तो सुंदर आहे?' पुढे तो म्हणाला, 'एके संध्याकाळी फिरायला गेलो असताना काही फूट अंतरावर एक साप पाहून मी खूप घाबरलो होतो, मला वाटले की मी मरेनच.' तर दुसऱ्या एका व्यक्तीने लिहिले की, 'आपल्या रस्त्यांवरील दुभाजकांवरही इतके सुंदर पट्टे नसतात.' त्यानंतर अनेक लोकांनी सापाच्या रंगाबद्दल लिहिले. एकाने लिहिले की, 'त्याच्या तीव्र विषामुळे इतर प्राणी त्याच्यापासून दूर राहावेत, यासाठी निसर्गानेच त्याला हा रंग दिला आहे.' तर दुसऱ्या एका दर्शकाने लिहिले की, 'ही सर्व निसर्गाची किमया आहे.'
बँडेड क्रेट (Banded Krait)
बँडेड क्रेट हा भारतीय उपखंड आणि आग्नेय आशियाच्या काही भागांमध्ये आढळणारा एक मोठा आणि आकर्षक पट्टे असलेला विषारी साप आहे. व्हिडिओखाली त्यांनी सापाची ओळख करून देणारी एक छोटी टीप लिहिली. काळे आणि पिवळे रुंद पट्टे आणि त्रिकोणी आकाराच्या शरीरामुळे तो सहज ओळखता येतो. तो बहुतेकदा रात्री सक्रिय असतो. तो लाजाळू स्वभावाचा असून शक्यतो मानवी संपर्क टाळतो. दिवसा, तो सहसा बिळे, पानांचे ढिगारे किंवा पाण्याच्या जवळ लपून बसतो.
बँडेड क्रेटमध्ये शक्तिशाली न्यूरोटॉक्सिक विष असले तरी, तो सहसा आक्रमक नसतो आणि क्वचितच चावतो. सामान्यतः सापाला हाताळताना किंवा त्याला डिवचल्यास तो हल्ला करतो. तो इतर साप, पाली आणि लहान जीव खातो. पर्यावरणीय संतुलन राखण्यात तो महत्त्वाची भूमिका बजावतो. तो सहसा शांतपणे वागतो, ज्यामुळे या सापापासून होणारा धोका टाळण्यास मदत होते, असेही त्यांनी पुढे म्हटले.


