सार
Ganesh Chaturthi 2024 : गणेशोत्सवाच्या सणाची मोठ्या उत्साहाने वाट पाहिली जाते. देशभरात गणेशोत्सवाची धूम पहायला मिळते. अशातच कोकणातील वेंगुर्ल्यात असणाऱ्या स्वयंभू अशा रेडी गणपतीबद्दची अख्यायिका आणि मंदिराबद्दल सविस्तर जाणून घेऊया.
Redi Ganpati Vengurla : येत्या 7 सप्टेंबरपासून गणशोत्सवाची सुरुवात होणार आहे. देशभरात वेगवेगळ्या ठिकाणी गणेशोत्सवाची मोठी धूम पहायला मिळते. खासकरुन कोकणात गणेशोत्सवासाठी मुंबईकर मोठ्या संख्येने जातात. अशातच कोकणातील स्वयंभू अशा रेडी गणपतीबद्दलची आख्यायिका तुम्हाला माहितेय का? याबद्दलच जाणून घेऊया…
सुमारे तेराव्या शतकात रेडी ही रेवतीनगर या नावाने सलेश्वर राजाची राजधानी म्हणून ओळखली जात होती. यादरम्यान नाथपंथी सांप्रदायाचा प्रसार सुरू होता. त्यावेळचे नाथपंथीय श्री सिद्धेश्वर आणि आज तळवणे येथे समाधिस्थ झालेले परशुराम भारती महाराज यांनी नाथपंथांच्या प्रसारासाठी कोकण भागात वास्तव्य केले होते. सिद्धपुरुषाच्या सिद्धविद्येने सत्येश्वर राजा भयभीत झाला होता. त्याने कट करून सिद्धपुरुषाला मारण्याचा प्रयत्न केला असता समुद्राने उग्ररूप धारण करून सत्येश्वर राजा व त्याची राजधानी रेवतीनगरला बुडवून टाकले अशी आख्यायिका सांगितली जाते. रेवतीनगरच्या अस्तानंतर या भूमीचे अस्तित्व व जागृती कायम टिकवून राहावी यासाठी ग्रामदेवता धावून आली. माऊली देवीच्या स्थापनेचा इतिहास देवी कोषामध्ये मिळतो.
नवसाला पावणारी देवी श्रीदेवी माऊली
श्रीदेवी माऊली (आदिमाया) ही स्वयंभू व नवसाला पावणारी देवता रेडी येथे अनादिकाळापासून आहे असे सांगितले जाते. श्रीदेवी माऊलीला पार्वती म्हणूनही मानण्यात येते. कारण तिच्या शोधार्थ श्रीदेव महादेवाचा या भूमीला पदस्पर्श झाल्याने माऊली मंदिराजवळ स्वयंभू श्री महादेव मंदिर आणि 33 वर्षापूर्वी साक्षात्कारातून प्रकट झालेले द्विभुज श्रीगजानन ही तिन्ही ठिकाणे एका त्रिवेणी संगमात असल्याचे तेथे पहायला मिळते.
गेल्या 50-60 वर्षापासून अंधारी देवता श्रीदेवी माऊली देवीच्या चतु:सीमेत काळे सोने असल्याचे सांगत होती. पण याचा अर्थ त्यावेळी कोणालाही समजला नाही. त्यानंतर रेडीत खाण व्यवसाय सुरू झाल्यानंतर रेडीतील स्थानिकांना त्याची प्रचिती आली. सध्या असलेल्या माऊली मंदिराचा मुख्य भाग सुमारे अडीचशे वर्षापूर्वी बांधल्याचे सांगितले जाते. मंदिराच्या घुमटाचे प्लास्टर 1828 मध्ये पूर्ण केल्याची नोंद मंदिराच्या भिंतीवर करण्यात आली आहे. जिल्ह्याच्या तुलनेत छोटेसे दिसणारे हे गाव असले तरी गावाची महती अवर्णनीय अशीच आहे.
वेंगुर्ल्यातील किल्ला
वेंगुर्ले तालुक्यापासून 18 ते 20 कि.मी. अंतरावर हे रेवतीनगर आहे. येथे सोळाव्या शतकात विजापूरच्या आदिलशहाने खाडीच्या मुखाशी, मोक्याच्या ठिकाणी किल्ला बांधला. रेडी गावातून प्रवेशद्वारापर्यंत जाणारी वाट आहे. इ.स.1632 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला ताब्यात घेऊन त्यास ‘यशवंतगड’ असे नाव दिले. त्यावेळी या किल्ल्याची दुरुस्तीही केली मात्र कालांतराने 1819 च्या सुमारास इंग्रजांनी हा किल्ला सावंतवाडीकरांकडून जिंकून घेतला.
स्वातंत्र्यानंतर काही वर्षे या गडाकडे शासनाचे लक्ष होते परंतु त्यानंतर होत गेलेले दुर्लक्ष झाले. वास्तविक येथील सुंदर सागरतीर, सभोवतालची वनराई आणि शिवस्पर्शाच्या इतिहासाची अखंड साथ मिळालीहोती. विशेष म्हणजे गडाच्या प्रवेशद्वारापासून एक वाट समुद्रकिनारा व तटाच्या बाजूने जाते. तेथे तटाच्या आतील बाजूस एका चौकोनी घुमटीत गणपतीची कोरीव पण दुर्लक्षित मूर्ती आहे. रेडीच्या प्रसिद्ध द्विभुज गणपतीच्या मूर्तीसारखीच या मूर्तीची जडणघडण आहे.
रेडी गणपतीची अख्यायिका
रेडी येथील नागोळावाडीतील एक तरुण सदानंद नागेश कांबळी हा ट्रक ड्रायव्हर म्हणून एका मायनिंगच्या कंपनीमध्ये कामाला होते. खनिजाची ने-आण करण्यासाठी खाणीवरून बंदराकडे व बंदरावरून खाणीकडे त्याच्या ट्रकची ये-जा असायची. 8 एप्रिल 1967 रोजी एका विशिष्ठ ठिकाणी कांबळी यांनी आपला ट्रक उभा केल्यानंतर तेथेच झोपले.
पहाटेच्या सुमारास कांबळी यांना स्वप्न पडले व स्वप्नामध्ये गणपती आला. त्यावेळी श्री गणपतीने सध्या मंदिर असलेल्या ठिकाणी आपली मूर्ती असल्याचे सांगितले. स्वप्नातील त्या दृष्टांतानुसार कांबळी यांनी वासुदेव जुवलेकर आणि काही ग्रामस्थांच्या सहकार्याने तेथे खोदकाम सुरू केले आणि खोदताना गणपतीच्या मूर्तीच्या तोंडाचा भाग व कानाचा भाग दिसताक्षणी त्यांना आश्चर्याचा धक्काच बसला. त्यामुळे तात्काळ सर्वानी ग्रामदेवता श्री माऊली देवीकडे जाऊन कौल घेतला. त्यावेळी देवीकडूनही चांगला प्रसाद मिळून संपूर्ण मूर्ती कोरण्याचा व श्री गणपतीच्या मूर्तीची स्थापना करण्याचा आदेश दिला म्हणून खोदकाम सुरूच ठेवले.अखेर एक महिन्याच्या कालावधीत म्हणजे 1 मे 1967 रोजी गणपतीची पूर्ण मूर्ती दिसू लागली. अखंड जांभ्या दगडात कोरलेली ही मूर्ती सहा फूट उंच व तीन फूट रुंद आहे.
मूर्ती बसलेल्या स्थितीत असून एक पाय दुमडलेला आहे. द्विभुज मूर्तीचा एक हात आशीर्वाद देत असून दुस-या हातात मोदक आहे. गणपतीच्या समोर एक भला मोठा उंदीरही आहे. तोही याच खोद कामात पण मूर्तीनंतर सव्वा महिन्यांनी सापडला. द्विभुज ही गणपतीची भव्य दिव्य, आकर्षक व प्रसन्न मूर्ती सर्वच भक्तांना भाराऊन टाकते. ही गणपतीची मूर्ती पांडवकालीन असावी, असा अनेकण अंदाज लावतात. कालांतराने 1968 साली या गणपतीचे सुंदर मंदिर बांधण्यात आले. कोकणामध्ये गणपतीला आराध्य दैवत मानले जाते. त्यामुळे सिंधुदुर्गामध्ये आलेला भाविक किंवा पर्यटक रेवतीनगरच्या द्विभुज गणपतीच्या दर्शनासाठी गेला नाही असे होत नाही.
आणखी वाचा :
Ganesh Chaturthi 2024 : केवळ 500 रुपयांत करा बाप्पाची आरास, पाहा DIY डेकोरेशन
Ganesh Chaturthi 2024 : जापानसह या पाश्चिमात्य देशांमध्ये केली जाते गणपतीची पूजा