एका ३३ वर्षीय डॉक्टरला महिन्याला ३ लाख रुपये पगार आहे. पण १८ हजार रुपये देऊन ड्रायव्हर ठेवायला त्याला जड जात आहे. रोज ६० किलोमीटर गाडी चालवून तो थकून जातो. त्याने रेडिटवर लोकांचा सल्ला मागितला. स्वतःच्या सुरक्षिततेसाठी तातडीने ड्रायव्हर ठेवण्याचा सल्ला नेटकऱ्यांनी त्याला दिला आहे.
मुंबई : एका तरुण डॉक्टरला महिन्याला ३ लाख रुपये पगार आहे, पण ड्रायव्हर ठेवायला त्याला नको वाटत आहे. या डॉक्टरने सोशल मीडियावर लोकांचा सल्ला मागितला. त्याची ही पोस्ट आता चांगलीच चर्चेत आली आहे. ३३ वर्षांच्या या डॉक्टरला रोज जवळपास ६० किलोमीटर गाडी चालवावी लागते. पण ड्रायव्हरचा खर्च वाचवण्यासाठी तो स्वतःच गाडी चालवतो. यावर त्याने रेडिटवर एक पोस्ट लिहिली, ती आता व्हायरल झाली आहे.
रोज ६० किलोमीटरचा प्रवास
हा डॉक्टर २५ किलोमीटर अंतरावर असलेल्या दोन वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये काम करतो. त्यामुळे त्याला रोज ६० किलोमीटर गाडी चालवावी लागते. ट्रॅफिक जॅम आणि पार्किंगच्या समस्येमुळे काम संपवून घरी येईपर्यंत तो शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या पूर्णपणे थकून जातो. महिन्याला ३ लाख रुपये कमाई असली, तरी ड्रायव्हरसाठी १८ हजार रुपये खर्च करणं योग्य आहे का, असा प्रश्न त्याने विचारला. ही पोस्ट पडताच लोकांनी त्याला पाठिंबा दिला. लवकरात लवकर ड्रायव्हर ठेवण्याचा सल्ला लोकांनी त्याला दिला.
'लवकरात लवकर ड्रायव्हर ठेवा'
"थकलेल्या अवस्थेत गाडी चालवताना होणाऱ्या अपघातांचा विचार करा. गाडी चालवताना एका सेकंदासाठी जरी लक्ष विचलित झालं, तरी मोठा अपघात होऊ शकतो. यामुळे इतरांच्या जीवालाही धोका आहे. त्यामुळे पैशांचा विचार न करता ड्रायव्हर ठेवा," असा सल्ला एका युजरने दिला. दुसऱ्या एकाने आपला अनुभव सांगताना लिहिलं, "१२ वर्षांपूर्वी माझा पगार १ लाख रुपयेही नव्हता, तेव्हा मी ड्रायव्हर ठेवला होता. त्यावेळी अनेकांनी माझी खिल्ली उडवली. पण तो माझा सर्वात हुशार निर्णय होता.
ड्रायव्हिंगचा थकवा न येता मी घरी पोहोचायचो. तो वेळ मी कुटुंबासाठी देऊ शकायचो." आणखी एकाने लिहिलं, "शांततेसाठी आणि जीवनमान सुधारण्यासाठी तुम्ही करू शकणारी ही सर्वात चांगली गोष्ट आहे. पण एक चांगला ड्रायव्हर शोधा. तुम्ही सांगत असलेले १८ हजार रुपये खूप कमी आहेत." थोडक्यात सांगायचं तर, पैशांपेक्षा स्वतःच्या सुरक्षिततेला आणि आरोग्याला महत्त्व द्या. तातडीने ड्रायव्हर ठेवा, असा सल्ला बहुतांश लोकांनी या डॉक्टरला दिला आहे.
