दररोजच्या ताणतणावात विविध व्याधी  पाठी लागतात. तर, 40 किंवा 50 वर्षांच्या काही लोकांना सामान्यतः सर्व्हायकल स्पॉन्डिलोसिस, झोपेची कमतरता, वाढलेला ताण आणि अपुरी झोप यांचा अनुभव येतो. 

सध्या आयुष्य हे यंत्रवत झालं आहे. दैनंदिन रुटिन फारसं बदलत नाही. सकाळी ऑफिसला वेळेत पोहोचण्याची गडबड आणि नंतर टार्गेट पूर्ण करण्याची धडपड… यामध्ये जेवणाची आबाळ होते, तर दुसरीकडे ताणतणावाचाही सामना करावा लागतो. मग अशातच मधुमेह, रक्तदाब यासारखे विकार मागे लागतात. पण काही जणांची समस्या याहून वेगळी आहे. त्यांना सकाळी झापून उठल्यावर डोकेदुखीचा त्रास सुरू होतो. यामागची काय कारणे आहेत, ते पाहूया.

रात्रभर झोप घेऊनही आणि विश्रांती घेऊनही डोकेदुखी थांबत नाही, असे म्हणणारे अनेक लोक आहेत. अभ्यासानुसार, दर तेरापैकी एका व्यक्तीला सकाळी डोकेदुखीचा अनुभव येतो. त्यातही पुरुषांच्या तुलनेत महिलांमध्ये सकाळी होणाऱ्या डोकेदुखीचे प्रमाण अधिक आहे. सकाळी होणाऱ्या डोकेदुखीमागे अनेक कारणे आहेत. यामागील काही कारणांबद्दल मुंबई सेंट्रल येथील वोक्हार्ट हॉस्पिटलमधील इंटर्नल मेडिसिन कन्सल्टन्ट डॉ. हनी सावला यांनी माहिती दिली आहे.

साधारणपणे 40 किंवा 50 वर्षांच्या लोकांना सामान्यतः सर्व्हायकल स्पॉन्डिलोसिस, झोपेची कमतरता, वाढलेला ताण आणि अपुरी झोप यांचा अनुभव येतो. हार्मोनल बदल, रक्तदाबातील चढ-उतार, घोरणे किंवा स्लीप ॲप्नियासारखे झोपेचे विकार देखील याच काळात सुरू होऊ शकतात. हे सर्व घटक सकाळी होणाऱ्या डोकेदुखीची शक्यता वाढवतात, असे डॉ. हनी सावला सांगतात.

मुंबईतील परळ येथील ग्लेनिगल्स हॉस्पिटलमधील इंटर्नल मेडिसिनच्या सीनिअर कन्सल्टन्ट डॉ. मंजुषा अग्रवाल यांनी सांगितले की, जास्त वेळ काम करणे आणि रात्री दात खाण्याची सवय देखील याला कारणीभूत ठरू शकते. कधीकधी, खूप उशिरा झोपणे, झोपण्यापूर्वी मोबाइल फोन वापरणे किंवा जास्त प्रमाणात कॅफीनचे सेवन करणे यासारख्या लहान सवयींमुळेही सकाळी उठल्यावर डोकेदुखी होऊ शकते, असेही त्या सांगतात.

काही लोकांना रात्री दात खाण्याची सवय असते. अनेकांना तर आपण असे करतो हे माहीतही नसते. सतत असे केल्याने दात आणि त्या भागातील स्नायूंना इजा होऊ शकते. याचा झोपेवरही परिणाम होऊ शकतो. यामुळे दुसऱ्या दिवशी डोकेदुखीने उठण्याची शक्यता असते, असे आरोग्य तज्ज्ञ सांगतात.

जेव्हा तुम्ही पोटावर झोपता, तेव्हा चेहरा खाली करून श्वास घेणे शक्य नसते. त्यामुळे तुमची मान नैसर्गिकरित्या तासनतास एका बाजूला वळलेली राहते. यामुळे मानेचा कणा (सर्व्हायकल स्पाइन) त्याच्या सामान्य स्थितीमधून सरकतो. तुमच्या मानेच्या आणि पाठीच्या वरील भागातील स्नायूंवर रात्रभर ताण येतो. हा ताण सकाळी सौम्य डोकेदुखीचे कारण बनू शकतो.

झोपताना तुमची स्थिती आणि पद्धत खूप महत्त्वाची असते. गादी आणि उशी शरीरावर ताण न देणारी असावी, याची काळजी घ्या. मायग्रेनमुळे तीव्र डोकेदुखीचा त्रास होणारे अनेक लोक आहेत. अनेक लोकांमध्ये सकाळी होणाऱ्या डोकेदुखीमागे मायग्रेन हे देखील एक कारण असू शकते.