सार
Bhimashankar temple : येत्या 26 फेब्रुवारीला महाशिवरात्री साजरी केली जाणार आहे. या दिवशी भगवान शंकराची मोठ्या भक्तीभावाने पूजा केली जाते. देशभरात भगवान शंकराची 12 ज्योतिर्लिंगे आहेत. पण महाराष्ट्रातील भीमाशंकर ज्योतिर्लिंगाबद्दल जाणून घेऊया.
Bhimashankar temple : 12 ज्योतिर्लिंगापैकी एक असणारे श्रीक्षेत्र भीमाशंकर. पण हे पर्यटनस्थळ म्हणून अधिक नावारूपाला आले आहे. पुणे जिल्यातील खेड तालुक्यात भीमाशंकर असून या ज्योतिर्लिंगामधून महाराष्ट्रातील मुख्य नद्यांपैकी एक भीमा नदी उगम पावते. सह्याद्रीच्या प्रमुख रांगेतील हे ठिकाण घनदाट अरण्याने वेढले असून 1984 मध्ये याची अभयारण्य म्हणून घोषणा करण्यात आली आहे. भीमाशंकर हे अत्यंत सुंदर ठिकाण असून भीमा नदीचा उगम पाहणे हा अविस्मरणीय आनंद आहे.
हेमाडपंथी असणारे हे मंदिर सुमारे 1200-1400 वर्षांपूर्वीचे आहे. मात्र आता याचे नवे बांधकाम करण्यात आले आहे. शिवाजी महाराजदेखील येथे दर्शनाला जात असत असे म्हटले जाते. आता येथे आधुनिक कॅमेरा लावण्यात आले असून संपूर्ण परिसरावर लक्ष ठेवण्यात येते.
भीमाशंकर नाव का प्राप्त झाले याची एक अप्रतिम आख्यायिका आहे. कुंभकर्णाच्या पत्नीने कुंभकर्णाचा वध झाल्यानंतर मुलगा भीमाला देवदेवतांपासून दूर ठेवण्याचा निर्णय घेतला. मोठा झाल्यानंतर आपल्या वडिलांच्या मृत्यूचे कारण समजल्यानंतर देवांचा बदला घ्यायचे ठरवले आणि ब्रम्हदेवाची कठोर तपस्या केली. त्याच्याकडून सर्वात बलशाली होण्याचे वरदान घेतले. एकदा असेच जात असताना राजा कामरूपेश्वराला महादेवाची भक्ती करताना पाहून आपली भक्ती करण्यास भीमाने सांगितले. मात्र राजाने नकार दिल्यावर त्याने त्याला बंदिस्त केले. कारागृहात राजाने शिवलिंग तयार करून पूजा करायला सुरूवात केली. भीमाने रागाने हे तलवारीने तोडण्याचा प्रयत्न केला असता त्यातून महादेव प्रकट झाले. त्यानंतर शिव आणि भीममध्ये युद्ध झाले आणि त्यात भीमाचा मृत्यू झाला. त्यानंतर महादेवांना तिथेच वास्तव्य करण्याची राजाने विनंती केली. भीमाशी युद्ध केल्यामुळे या ठिकाणाला भीमाशंकर असे नाव पडले.
कसे पोहचाल
जवळचे रेल्वे स्टेशन – पुणे
पुण्याहून भीमाशंकरसाठी दर अर्ध्या तासाने नियमित बस सोडण्यात येतात. तसंच इथून तुम्हाला प्रायव्हेट टॅक्सी अथवा कारही करता येते.
आणखी वाचा :
महाशिवरात्रीच्या दिवशी चुकूनही खाऊ नका या गोष्टी, भोलेनाथ होतील नाराज