पूर्वी आपल्या कानांना दिवसातून किमान ८ तास विश्रांती मिळायची. पण आता इयरबड्स एखाद्या दागिन्यासारखे झालेत. यामुळे दोन मोठे प्रॉब्लेम होतात. एक म्हणजे कानातला मळ बाहेर येण्याऐवजी आत ढकलला जातो.
मुंबई : गेल्या काही वर्षांत क्लिनिकमध्ये येणाऱ्या रुग्णांमध्ये एक मोठा बदल दिसतोय. येणाऱ्यांपैकी बहुतांश जण १८ ते ३० वयोगटातले आहेत. त्यांना कोणताही गंभीर आजार नसतो, पण त्यांच्या तीन तक्रारी कायम असतात - "डॉक्टर, नाक नेहमी बंद असल्यासारखं वाटतं", "घशात काहीतरी अडकल्यासारखं वाटतं" आणि "कानात काहीतरी गेल्यासारखं वाटतं". याचं कारण धूळ किंवा थंडी नाही, तर आपली बदललेली जीवनशैली आहे.
'इयरबड इयर' नावाचा नवा आजार
पूर्वी कानांना दिवसातून किमान ८ तास विश्रांती मिळायची. आता इयरबड्स आपल्या शरीराचाच एक भाग झालेत. यामुळे दोन मोठे प्रॉब्लेम होतात. इयरबड्समुळे कानातला मळ बाहेर येण्याऐवजी आत ढकलला जातो. शिवाय, कानात अंधार, उष्णता आणि ओलावा राहिल्याने फंगस वाढायला एकदम पोषक वातावरण मिळतं. म्हणूनच आजकाल तरुणांमध्ये कानाला खाज सुटणे आणि फंगल इन्फेक्शनचे प्रमाण वाढले आहे. ही बहिरेपणाची सुरुवात असू शकते, पण आपल्याला त्याचा पत्ताच नसतो.
टेक नेकमुळे नाक बंद होणे
दिवसभर फोनमध्ये मान घालून बसल्याने मानेच्या मागचे स्नायू आखडतात. याचा थेट परिणाम नाक आणि सायनसकडे जाणाऱ्या रक्तप्रवाहावर आणि नसांवर होतो. यामुळे रात्री नाक भयंकर चोंदतं आणि सकाळी उठल्यावर घशात कफ जमा झाल्यासारखा वाटतो. अनेक जण याला ॲलर्जी समजतात आणि महिनोनमहिने चुकीची औषधं घेत राहतात.
३. तोंडाने श्वास घेतल्याने चेहऱ्याची ठेवण बदलते
नाक बंद असल्याने सतत तोंडाने श्वास घेण्याची सवय लागते. यामुळे वयाच्या २५ व्या वर्षीच झोपेत घोरण्याची सवय लागते. हा फक्त आवाज नसून यामुळे तुमच्या झोपेची क्वालिटी खराब होते. सकाळी उठल्यावर थकवा जाणवतो आणि दीर्घकाळात यामुळे चेहऱ्याची रचनाही बदलू शकते.
आपण काय करायला हवं?
६०-६० चा नियम पाळा - ६०% आवाजात सलग ६० मिनिटांपेक्षा जास्त वेळ इयरबड्स वापरू नका. त्याऐवजी स्पीकर किंवा ओव्हर-द-हेड हेडफोन्स वापरा.
रात्री झोपताना फोन दूर ठेवा. झोपण्यापूर्वी सलाईन वॉटरने नाक साफ केल्यास एसीमधील धुळीमुळे बंद झालेलं नाक मोकळं होईल.
नाकाने श्वास घेण्याची सवय लावा. दिवसातून ५ मिनिटे तोंड बंद ठेवून नाकाने दीर्घ श्वास घ्या. नाक मोकळं करण्यासाठी हा सर्वात उत्तम व्यायाम आहे.
दोन आठवड्यांपेक्षा जास्त काळ नाक बंद असेल, घशात काहीतरी अडकल्यासारखं वाटत असेल किंवा घोरण्याची सवय असेल, तर त्याकडे ॲलर्जी म्हणून दुर्लक्ष करू नका. ईएनटी (ENT) डॉक्टरांना भेटून नाकाची एंडोस्कोपी करून घ्या.
आपले कान, नाक आणि घसा यांचा थेट संबंध आपल्या स्क्रीन टाईमशी आहे, हे आता नवं सत्य आहे.
लेखक:
डॉ. रशीद पी के,
ईएनटी सर्जन, थलस्सेरी मिशन हॉस्पिटल,
थलस्सेरी

