सार
सोशल मीडियावर लोकसभेच्या निवडणुकी संदर्भातील अनेक गोष्टी व्हायरल होत आहे. सध्या अशीच एक लग्नपत्रिका चर्चेत आली आहे.तुम्हाला वाटेल लग्न पत्रिका आणि निवडणुकीचा काय संबंध? त्यासाठी तुम्हाला हा व्हायरल फोटो पाहावा लागेल.हा फोटो पाहून तुम्हीही थक्क व्हाल.
सध्या सगळीकडे लोकसभेच्या निवडणुकीची जय्यत तयारी सुरू आहे. सोशल मीडियावर लोकसभेच्या निवडणुकी संदर्भातील अनेक गोष्टी व्हायरल होत आहे. सध्या अशीच एक लग्नपत्रिका चर्चेत आली आहे. तुम्हाला वाटेल लग्न पत्रिका आणि निवडणुकीचा काय संबंध? त्यासाठी तुम्हाला हा व्हायरल फोटो पाहावा लागेल. हा फोटो पाहून तुम्हीही थक्क व्हाल.
व्हायरल लग्नपत्रिका :
हा फोटो पाहिल्यानंतर सुरूवातीला तुम्हालाही वाटेल की ही लग्नाची पत्रिका आहे पण जेव्हा तुम्ही नीट वाचाल तर तुम्हाला कळेल की ही लग्नाची पत्रिका नाही तर या हटके पत्रिकाद्वारे मतदान करण्यासाठी विनंती केली आहे. ही व्हायरल पत्रिका पुण्याची आहे.या पत्रिकावर सुरुवातीला लिहिलेय, “मी प्रथमत: व अंतिमत: भारतीय” त्यानंतर त्या खाली लिहिलेय, “आग्रहाचे निमंत्रण” लग्न पत्रिकेमध्ये वधु वराविषयी माहिती दिली जाते.या पत्रिकेमध्ये मतदार आणि लोकशाहीविषयी माहिती दिली आहे. चि. मतदारला ‘भारतीय नागरिकांचा ज्येष्ठ चिरंजीव’म्हटले आहे तर चि. सौ. का. लोकशाहीला ‘भारतीय संविधानाची ज्येष्ठ सुकन्या’ लिहिलेय.
आवाहनाला लग्नपत्रिकेचे स्वरूप:
संविधानाने दिलेला मतदानाचा हक्क प्रत्येकाने बजवावा मतदानासाठी यावे, असे मतदारांना आवाहन या पत्रिकेतून करण्यात आले आहे. मतदारांमध्ये मतदानाविषयी जागरूकता वाढविण्यासाठी या आवाहनाला लग्नपत्रिकेचे स्वरूप देण्यात आले आहे.
मतदान करायला यायचं हं... :
पत्रिकेवर आपले विनीत म्हणून आम्ही भारताचे लोक असे नमूद करण्यात आले आहे. तसेच वरील विनंतीला मान देऊन मतदान करायला यायचं हं... आमच्याशिवाय तर मज्जाच नाही.. कु. निळीशाई व चि. ई. व्ही. एम... असे मजेशीर वाक्य लिहिण्यात आले आहे.
आहेर आणि रिटर्न गिफ्ट :
मतदार जनजागृती पत्रिकेत सर्वांत शेवटी 'टीप' लिहिण्यात आली आहे. हीच 'टीप' सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. टीप : आपले मतदान हाच आमचा आहेर अन् विकसित भारत हेच तुमचे रिटर्न गिफ्ट. हे वाक्य लक्ष वेधून घेत आहे.