आपल्या शरीरात व्हिटॅमिन B12 ची कमतरता निर्माण झाल्यावर काही लक्षणं दिसू लागतात. पण अनेकदा आपण या लक्षणांना सामान्य आरोग्य समस्या समजून त्याकडे दुर्लक्ष करतो.
मुंबई : आपल्या शरीरातील नर्व्हस सिस्टीम (मज्जासंस्था) योग्यप्रकारे काम करण्यासाठी आणि रक्ताच्या पेशी तयार होण्यासाठी व्हिटॅमिन B12 हे एक अत्यंत महत्त्वाचं पोषक तत्व आहे. पण अनेकदा शरीरात B12 ची कमतरता निर्माण झाल्यावर दिसणाऱ्या लक्षणांना लोक इतर सामान्य आरोग्य समस्या समजून त्याकडे दुर्लक्ष करतात. व्हिटॅमिन B12 च्या कमतरतेमुळे दिसणारी काही प्रमुख लक्षणं खालीलप्रमाणे आहेत.
जिभेवर होणारे बदल
जर तुमची जीभ नेहमीपेक्षा जास्त गुळगुळीत, लाल आणि सुजलेली किंवा दुखत असेल, तर हे व्हिटॅमिन B12 च्या कमतरतेचं लक्षण असू शकतं.
हाता-पायांना मुंग्या येणं आणि बधिरपणा
नसांच्या (Nerves) योग्य कार्यासाठी व्हिटॅमिन B12 खूप आवश्यक आहे. त्याच्या कमतरतेमुळे पेरिफेरल नसांवर (peripheral nerves) परिणाम होतो. हाता-पायांना नेहमीपेक्षा जास्त मुंग्या येणं, बधिरपणा किंवा वेदना होणं, ही B12 च्या कमतरतेच्या सुरुवातीच्या लक्षणांपैकी एक आहे.
कारण नसताना थकवा येणं
लाल रक्तपेशींच्या (Red Blood Cells) निर्मितीमध्ये व्हिटॅमिन B12 महत्त्वाची भूमिका बजावतं. त्याच्या कमतरतेमुळे ॲनिमिया (Anemia) म्हणजेच रक्ताची कमतरता होऊ शकते. खूप जास्त थकवा, अशक्तपणा, चक्कर येणं आणि श्वास घ्यायला त्रास होणं ही त्याचीच लक्षणं आहेत.
विसरभोळेपणा आणि मूडमध्ये बदल
व्हिटॅमिन B12 चा परिणाम आपल्या सेंट्रल नर्व्हस सिस्टीमवर (Central Nervous System) होतो. त्यामुळे B12 च्या कमतरतेमुळे मेंदूपर्यंत जाणारे नर्व्ह सिग्नल बाधित होतात. यामुळे लक्ष केंद्रित करण्यात अडचण येणं, विचार करण्याची क्षमता मंदावणं, विसरभोळेपणा आणि अचानक मूड बदलणं (Mood Swings) यांसारख्या समस्या उद्भवू शकतात.
शरीराचा तोल जाणं
व्हिटॅमिन B12 च्या कमतरतेचा परिणाम नर्व्हस सिस्टीमवर होत असल्यामुळे शरीराच्या हालचालींमध्ये समन्वय साधण्याच्या क्षमतेत अडथळा येतो. यामुळे चालताना शरीराचा तोल जाऊ शकतो किंवा पडायला होऊ शकतं.


