फ्लायदुबई विमानाच्या अपहरणाच्या प्रयत्नानंतर पायलट्सचे नियम आणि त्यांच्या दिनचर्येची जोरदार चर्चा सुरू आहे. विमानात दोन्ही पायलट्सना कधीच एकसारखं जेवण दिलं जात नाही. यामागचं मुख्य कारण म्हणजे फूड पॉयझनिंग. एकाच वेळी दोघांनाही विषबाधा होऊ नये आणि किमान एका पायलटला विमान सुरक्षितपणे उडवता यावं, यासाठी हा नियम पाळला जातो.

मुंबई : दुबईहून इस्रायलच्या तेल अवीवला जाणाऱ्या फ्लायदुबई विमानाच्या अपहरणाचा प्रयत्न नुकताच झाला. या घटनेने जगभरात खळबळ उडवून दिली. भारतीय वंशाचे पायलट कॅप्टन स्मिथ मच्चार यांच्या धाडसामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले. धक्कादायक बाब म्हणजे, ओमानच्या सह-पायलटनेच हा हल्ला केला होता. या घटनेनंतर आता सगळीकडे पायलट्सच्या ड्युटी आणि नियमांबद्दल चर्चा सुरू झाली आहे. पायलट्सची दिनचर्या, त्यांचं जेवण आणि विमानातले नियम याबद्दल अनेक गोष्टी लोकांना माहिती नसतात. एकाच विमानात असलेल्या दोन्ही पायलट्सना एकसारखं जेवण का दिलं जात नाही, हे तुम्हाला माहितीये का? यामागचं आश्चर्यकारक कारण आज आपण जाणून घेऊया.

विमानातल्या दोन्ही पायलट्सना एकसारखं जेवण का नसतं?

विमानाचे कॅप्टन ड्युटीवर असताना त्यांच्या आवडीनुसार जेवू शकत नाहीत. त्यांच्यासाठी जेवणाची आवड हा प्राधान्याचा विषय नसतो. विशेष म्हणजे, दोन्ही पायलट कधीच एकाच वेळी एकत्र बसून जेवत नाहीत. तसंच, कॅप्टन आणि फर्स्ट ऑफिसर यांना कधीच एकसारखं जेवण दिलं जात नाही. म्हणजे, जर एका पायलटला वरण-भात आणि पोळी दिली असेल, तर दुसऱ्याला तेच जेवण दिलं जात नाही. ही गोष्ट बहुतेकांना माहिती नसते. पण हा नियम का लागू आहे, ते समजून घेऊया.

पायलट्सच्या जेवणाचा असा नियम का आहे?

दोघांनी एकसारखं जेवण केलं आणि समजा ते जेवण खराब निघालं, तर एकाच वेळी दोन्ही पायलट्स आजारी पडू शकतात. अशी गंभीर परिस्थिती ओढवू नये म्हणून कॅप्टन आणि फर्स्ट ऑफिसरला नेहमी वेगवेगळे पदार्थ खायला दिले जातात. यामुळे जर एकाला फूड पॉयझनिंग झालं, तरी दुसऱ्या पायलटने वेगळं जेवण केलेलं असल्यामुळे तो सुरक्षित राहतो. अशा वेळी तो कॉकपिटची जबाबदारी सांभाळू शकतो. जेवल्यानंतर एका पायलटची तब्येत बिघडली, तरी दुसरा पायलट विमान उडवण्यासाठी फिट असतो.

एका पायलटला चिकन दिलं असेल, तर दुसऱ्याला पास्ता, मासे किंवा शाकाहारी जेवण दिलं जातं. जेवणाचा मेन्यू एअरलाईन्सच्या अंतर्गत सुरक्षा नियमांवर अवलंबून असतो. जेव्हा एक पायलट जेवत असतो, तेव्हा दुसरा पायलट विमानाचं नियंत्रण, कम्युनिकेशन आणि कॉकपिटची इतर कामं सांभाळत असतो.

पायलट्सना वेगवेगळं जेवण देणं हा प्रामुख्याने विमान वाहतूक सुरक्षेचा एक भाग आहे. जागतिक विमान वाहतूक प्राधिकरणाने हा नियम सक्तीचा केलेला नसला, तरी सुरक्षेचा उपाय म्हणून तो पाळला जातो. यामागचा मुख्य उद्देश एवढाच असतो की, कोणत्याही आणीबाणीच्या वेळी किमान एक पायलट विमान उडवण्यासाठी पूर्णपणे तयार असावा.

जमिनीवर चालणारं वाहन असेल, तर आपण ते रस्त्याच्या कडेला थांबवून जेवू शकतो. त्यासाठी एकच ड्रायव्हर पुरेसा असतो. पण हजारो फूट उंचावर उडणाऱ्या विमानात एकच पायलट असणं किती धोकादायक ठरू शकतं, याची आपण कल्पनाही करू शकत नाही. फ्लायदुबई विमानाच्या कॉकपिटमध्ये दोन पायलट्सव्यतिरिक्त अतिरिक्त क्रू मेंबर्सही होते. जेव्हा स्मिथ मच्चार यांच्यावर हल्ला झाला, तेव्हा प्रवाशांनी हल्लेखोराला पकडून खाली पाडलं. या झटापटीत विमान वेगाने खाली येऊ लागलं होतं, पण विमानातल्या दुसऱ्या एका क्रू मेंबरने वेळीच नियंत्रण मिळवून विमान पुन्हा योग्य उंचीवर नेलं. विचार करा, जर विमानात फक्त एक किंवा दोनच पायलट असते आणि मदतीला कोणी नसतं, तर काय झालं असतं?