West Bengal Election 2026: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीपूर्वी आलेल्या MATRIZE ओपिनियन पोलनुसार, TMC आणि भाजपमध्ये 'काटे की टक्कर' अपेक्षित आहे. दोन्ही पक्षांना मिळणाऱ्या जागा बहुमताच्या आकड्याच्या जवळ असून, ओवैसी-कबीर यांच्या नव्या आघाडीमुळे ममता बॅनर्जींच्या मतांमध्ये फूट पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

कोलकाता: संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. पण मतदानाचा टप्पा पार पडण्यापूर्वीच आलेल्या एका ओपिनियन पोलने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडवून दिली आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेस (TMC) आणि भाजप (BJP) यांच्यात 'काटे की टक्कर' होणार असल्याचे संकेत मिळत असून, बंगालमध्ये यंदा सत्तेचे पारडे कोणाकडे झुकेल, याबाबत प्रचंड अनिश्चितता निर्माण झाली आहे.

MATRIZE ओपिनियन पोल, चुरस की सत्तापालट?

MATRIZE या संस्थेच्या ताज्या सर्व्हेनुसार, बंगालमधील लढत अत्यंत अटीतटीची होणार आहे. मतांच्या टक्केवारीवर नजर टाकल्यास दोन्ही पक्षांमध्ये केवळ १ टक्क्याचा फरक दिसत आहे.

TMC: ४३ टक्के मते

BJP: ४२ टक्के मते

इतर: १६ टक्के मते

जागांचे गणित: बहुमताचा आकडा कोण गाठणार?

बंगाल विधानसभेच्या एकूण २९४ जागा असून सत्तेसाठी १४८ हा जादूचा आकडा गाठणे आवश्यक आहे. ओपिनियन पोलच्या अंदाजानुसार

TMC: १४० ते १६० जागा

BJP: १३० ते १५० जागा

इतर: ८ ते १६ जागा

या आकडेवारीवरून स्पष्ट होते की, दोन्हीपैकी कोणताही पक्ष स्पष्ट बहुमताच्या सीमारेषेवर उभा आहे. थोड्या जरी जागा इकडे-तिकडे झाल्या तरी बंगालमध्ये 'हँग असेंब्ली' किंवा सत्तापालटाची शक्यता नाकारता येत नाही.

ओवैसी आणि कबीर यांची युती, ममतांची डोकेदुखी वाढणार?

यंदाच्या निवडणुकीत नवीन राजकीय समीकरणांनी रंगत वाढवली आहे. टीएमसीमधून बाहेर पडलेले हुमायूं कबीर यांनी ‘आम जनता उन्नयन पार्टी’ स्थापन केली असून त्यांनी असदुद्दीन ओवैसी यांच्या AIMIM सोबत हातमिळवणी केली आहे. या नव्या आघाडीमुळे मुस्लिम बहुल मतदारसंघांमध्ये टीएमसीच्या मतांचे विभाजन होण्याची दाट शक्यता आहे, ज्याचा थेट फायदा भाजपला होऊ शकतो.

निवडणुकीचे वेळापत्रक (२०२६)

पहिला टप्पा: ३० मार्च रोजी अधिसूचना, ६ एप्रिल अर्ज भरण्याची शेवटची तारीख.

दुसरा टप्पा: २ एप्रिल रोजी अधिसूचना, ९ एप्रिल अर्ज भरण्याची शेवटची तारीख.

निकाल: संपूर्ण प्रक्रिया ६ मे २०२६ पर्यंत पूर्ण केली जाणार आहे.

तरुण मतदार ठरवणार 'किंगमेकर'!

बंगालमधील ६.४४ कोटी मतदारांपैकी २० ते २९ वयोगटातील १.३१ कोटी मतदार निर्णायक ठरणार आहेत. पहिल्यांदाच मतदान करणाऱ्या ५.२३ लाख तरुण मतदारांचा कल कोणाकडे राहतो, यावर बंगालचे भविष्य अवलंबून असेल. २०२१ मध्ये २१५ जागा जिंकणाऱ्या ममता बॅनर्जींसमोर यंदा भाजपने दिलेले आव्हान पेलणे हे मोठे आव्हान असणार आहे.