Ritu Tawde

Share this Video

मुंबई शिक्षक विकास मंडळाच्या एज्युकेशन अँड टेक्नॉलॉजी समिटमध्ये रितू तावडे यांनी शिक्षकांना AI तंत्रज्ञानासाठी तयार करण्यावर भर दिला. विद्यार्थ्यांना AIच्या माध्यमातून शिक्षण दिले जात असल्याने शिक्षकांनाही त्यासाठी प्रशिक्षण देणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. मुंबई महानगरपालिकेचा शिक्षण विभाग यासाठी आधीपासून काम करत असून त्या शिक्षण समितीच्या अध्यक्ष असताना AI लॅब सुरू करण्यात आल्याचे तावडे यांनी सांगितले. शिक्षकांसाठी AI तंत्रज्ञानाच्या वापरासंदर्भात प्रशिक्षण शिबिरे आणि विविध उपक्रम सुरू असल्याचेही त्यांनी नमूद केले. मुंबईच्या पाणीपुरवठ्याबाबत बोलताना धरणांमध्ये सध्या 97 टक्के पाणीसाठा असल्याचे रितू तावडे यांनी सांगितले. जाहीर करण्यात आलेली पाणीकपात मागे घेतली जाणार असून याबाबत अधिकृत घोषणा केली जाईल, असे त्यांनी सांगितले. ऑगस्ट 2027 पर्यंत पाण्याचे नियोजन करण्यात आले असून राखीव साठाही उपलब्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मात्र मुंबईकरांनी पाण्याची नासाडी टाळून पाणी जपून वापरण्याचे आवाहन त्यांनी केले. पुढील वर्षी पावसाची परिस्थिती कशी असेल हे आताच सांगता येणार नसल्याचेही त्यांनी नमूद केले. एंटरटेनमेंट टॅक्सच्या प्रस्तावाची माहिती घेऊन त्याबाबत सांगणार असल्याचे तावडे म्हणाल्या. राम मंदिर परिसरातील सार्वजनिक शौचालयात दोन युवकांचा गुदमरून मृत्यू झाल्याच्या घटनेला त्यांनी दुर्दैवी म्हटले. मृत्यू नेमका केमिकल्समुळे झाला की अन्य कारणामुळे, युवकांची प्रकृती कशी होती आणि ते कोणत्या परिस्थितीत शौचालयात गेले होते, या सर्व बाबी तपासाचा भाग असून वैद्यकीय अहवालानंतर कारण स्पष्ट होईल, असे रितू तावडे यांनी सांगितले.

Related Video