Restaurants in India Evade 70000 Crore Tax : देशभरातील रेस्टॉरंट्सनी बिलिंग सॉफ्टवेअरचा वापर करून तब्बल ७०,००० कोटी रुपयांचा टॅक्स चुकवल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
Restaurants in India Evade 70000 Crore Tax : देशभरातील रेस्टॉरंट्सनी बिलिंग सॉफ्टवेअरमध्ये फेरफार करून तब्बल ७०,००० कोटी रुपयांचा कर चुकवल्याचा एक मोठा घोटाळा उघडकीस आला आहे. हा घोटाळा ज्या पद्धतीने केला गेला, ते पाहून आयकर विभागाचे अधिकारीही चक्रावून गेले आहेत.
हैदराबादमधील काही स्थानिक बिर्याणी रेस्टॉरंट्सच्या खात्यांची तपासणी करत असताना आयकर विभागाला या देशव्यापी घोटाळ्याचा सुगावा लागला. धक्कादायक म्हणजे, या करचुकवेगिरीत कर्नाटक राज्यातील रेस्टॉरंट्स देशात पहिल्या क्रमांकावर आहेत.
२०१९ ते २०२६ या कालावधीतील १.७७ लाख रेस्टॉरंट्सच्या बिलांची AI तंत्रज्ञानाच्या मदतीने तपासणी केली असता हा घोटाळा समोर आला. या रेस्टॉरंट्सच्या २.४३ लाख कोटी रुपयांच्या बिलांची तपासणी केली असता, त्यापैकी १३,३१७ कोटी रुपयांची बिलं सॉफ्टवेअरमधून डिलीट करण्यात आल्याचं आढळून आलं.
घोटाळा व्हायचा कसा?
रेस्टॉरंट मालकांनी वेगवेगळ्या युक्त्या वापरून सरकारला चुना लावला आहे. काही रेस्टॉरंट्समध्ये ग्राहकांना बिल दिल्यानंतर ते सॉफ्टवेअरमधून आपोआप डिलीट व्हायचं. तर काही प्रकरणांमध्ये मालकांनी मुद्दाम काही बिलं रद्द केल्याचं दिसून आलं. इतकंच नाही, तर काही ठिकाणी संपूर्ण दिवसाची किंवा आठवड्याची बिलंच गायब करण्यात आली होती. काही मालकांनी बिलांमध्ये कोणताही बदल न करता, आयकर विभागाला कागदपत्रं सादर करताना उत्पन्न कमी दाखवून फसवणूक केली.
अधिकाऱ्यांनी स्वतः केली खात्री
हा घोटाळा खरा आहे की नाही हे तपासण्यासाठी, आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्वतः हैदराबादमधील ४० पेक्षा जास्त रेस्टॉरंट्समध्ये जाऊन जेवण केलं. पण नंतर कागदपत्रांची तपासणी केली असता, त्यांना दिलेलं बिल आणि रेस्टॉरंटच्या रेकॉर्डमधील बिलांमध्ये मोठी तफावत आढळली.
कर्नाटक नंबर वन
बिलं डिलीट करण्याच्या बाबतीत कर्नाटकची रेस्टॉरंट्स आघाडीवर आहेत. राज्यात अंदाजे २,००० कोटी रुपयांची बिलं डिलीट करण्यात आली आहेत. त्यानंतर तेलंगणा (१,५०० कोटी रु.) आणि तामिळनाडू (१,२०० कोटी रु.) यांचा क्रमांक लागतो.
अशी होती फसवणुकीची पद्धत
- ग्राहकांना बिल देण्यासाठी रेस्टॉरंट्स एक सॉफ्टवेअर वापरतात. देशातील जवळपास १ लाख रेस्टॉरंट्समध्ये एकाच प्रकारचं सॉफ्टवेअर वापरलं जातं.
- ग्राहक रोख, कार्ड किंवा UPI ने पैसे देतात. कर्मचाऱ्यांनी पैशांची अफरातफर करू नये म्हणून हे सॉफ्टवेअर प्रत्येक व्यवहाराची नोंद ठेवतं.
- हिशोब मिळाल्यानंतर मालक खरी करामत करतात. रोख रकमेत मिळालेली बिलं याच सॉफ्टवेअरचा वापर करून डिलीट केली जातात.
- याशिवाय, काही दिवसांची किंवा महिन्याभराची बिलं डिलीट करून आपलं उत्पन्न कमी झालं आहे, असं दाखवलं जातं.
AI मुळे घोटाळा उघड
हा घोटाळा उघड करण्यासाठी आयकर अधिकाऱ्यांनी १.७७ लाख रेस्टॉरंट्सच्या ६० टेराबाइट (TB) डेटाची तपासणी केली. या कामासाठी त्यांनी कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वापर केला, ज्यामुळे ही किचकट तपासणी सोपी झाली.
कुठे कितीची फसवणूक?
कर्नाटक: २,००० कोटी रु.
तेलंगणा: १,५०० कोटी रु.
तामिळनाडू: १,२०० कोटी रु.


