
Raksha Bandhan
मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी रक्षाबंधनानिमित्त माजी महापौर किशोरी पेडणेकर आणि चित्रा वाघ यांच्यासोबत राखीचा सण साजरा केला. किशोरी पेडणेकर यांनी स्वामी समर्थांची पूजा करून राखी बांधली. त्यानंतर रितू तावडे आणि किशोरी पेडणेकर यांनी एकमेकींना राखी बांधली तसेच चित्रा वाघ यांनाही राखी बांधण्यात आली. राजकीय पक्षांचे विचार वेगवेगळे असले तरी मनभेद नसून मुंबईकरांच्या सेवा-सुविधांसाठी सर्वजण एक असल्याचा संदेश तावडे यांनी दिला.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत झालेल्या भेटीबाबतही तावडे यांनी माहिती दिली. मुंबईतील पायाभूत सुविधा, शिक्षण, आरोग्य, महिला व मुलांची सुरक्षा आणि महापालिका व राज्य सरकारच्या माध्यमातून मुंबईकरांना अधिक चांगल्या सुविधा देण्याबाबत चर्चा झाल्याचे त्यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळाच्या 25 वर्षांच्या निमित्ताने होणाऱ्या सेवा पंधरवड्याबाबतही चर्चा झाली. गणेशोत्सवात गणेश मंडळांबाहेर BMCच्या माध्यमातून ‘आरोग्याचा श्रीगणेशा’ उपक्रम राबवण्याची माहिती त्यांनी दिली.रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी शिकण्यासाठी वर्षभराची मुदत देण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या निर्णयावरही त्यांनी भाष्य केले. अनेक वर्षांपासून मुंबईत राहणाऱ्यांना मराठी येत नसेल तर कार्यशाळा आणि सरावाच्या माध्यमातून वर्षभरात भाषा शिकता येईल, असे त्या म्हणाल्या. अमित ठाकरे यांच्या वक्तव्याबाबत माहिती नसल्याने त्यावर बोलणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.गणेशोत्सवाच्या तयारीसाठी 30 तारखेला BMCमध्ये बैठक होणार असून गणेश मंडळांचे प्रतिनिधी, आयुक्त, अतिरिक्त आयुक्त, पदाधिकारी आणि विरोधी पक्षनेते यामध्ये सहभागी होणार असल्याचे तावडे यांनी सांगितले. मंडळांच्या समस्या ऐकून आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यावर बैठकीत चर्चा होणार आहे.