Prajwal Revanna Jail : बंगळूरच्या परप्पना अग्रहार तुरुंगावर सीसीबीने अचानक छापा टाकला. यावेळी माजी खासदार प्रज्वल रेवण्णा मोबाईल वापरत असल्याचं उघड झालं. या प्रकरणी कर्तव्यात कसूर केल्यामुळे तुरुंगाचे सहाय्यक अधीक्षक ईरन्ना रंगापूर यांना निलंबित केलंय, तर तुरुंगात सिग्नल देणाऱ्या एअरटेल कंपनीवरही एफआयआर दाखल झाला आहे.

बंगळूरू : परप्पना अग्रहार सेंट्रल जेलमध्ये कैद्यांना मिळणाऱ्या 'राजासारख्या आदरातिथ्या'बद्दल आणि नियमबाह्य गोष्टींबद्दल गंभीर आरोप होत होते. यानंतर सीसीबीने (केंद्रीय गुन्हे शाखा) थेट तुरुंगावरच अचानक धाड टाकली. या कारवाईत अधिकाऱ्यांचा हलगर्जीपणा आणि गैरप्रकार उघड झाले असून, तुरुंगाचे असिस्टंट सुपरिटेंडेंट ईरन्ना रंगापूर यांना निलंबित करण्यात आलं आहे.

छापा रोखण्याचा प्रयत्न करणारे अधिकारीच निलंबित

याआधी जेव्हा कधी तुरुंगावर छापे पडले, तेव्हा असिस्टंट सुपरिटेंडेंट ईरन्ना यांनीच कैद्यांना सावध केल्याचा गंभीर आरोप आहे. अधिकारी तपासणीसाठी आल्यावर त्यांना कमीत कमी १५ ते २० मिनिटं बाहेरच थांबवून ठेवायचे, जेणेकरून कैद्यांना मोबाईल आणि इतर प्रतिबंधित वस्तू लपवायला वेळ मिळावा, असं म्हटलं जातं. पण यावेळी सीसीबीच्या अधिकाऱ्यांनी ईरन्ना यांच्या बोलण्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं आणि थेट तुरुंगात घुसून कारवाई सुरू केली.

प्रज्वल रेवण्णाचा मोबाईलवर बोलतानाचा व्हिडिओ व्हायरल, काय आहे संभाषण?

माजी खासदार प्रज्वल रेवण्णा तुरुंगातील आपल्या सेलमध्ये उभे राहून हसत-हसत जवळच्या व्यक्तींशी मोबाईलवर बोलत असल्याचा १७ सेकंदांचा एक व्हिडिओ समोर आला आहे, जो आता व्हायरल झालाय. या संभाषणात समोरची व्यक्ती म्हणते, "तुम्ही फोनच केला नाही म्हणून ते रडत आहेत, आधी बाहेर या." त्यावर प्रज्वल उत्तर देतो, "मी त्यांना परवाच फोन केला होता." हे संभाषण त्यात रेकॉर्ड झालं आहे.

हा व्हिडिओ तीन-चार महिने जुना असल्याचा संशय आहे. त्यामुळे तुरुंग अधिकाऱ्यांनी पैसे घेऊन प्रज्वलला अनेक महिन्यांपासून मोबाईल वापरायला दिला होता का, अशी शंका निर्माण झाली आहे. ६ ऑगस्ट रोजी तुरुंग कर्मचाऱ्यांनी केलेली बॅरेकची तपासणी केवळ एक फार्स होता का, असा प्रश्नही आता विचारला जात आहे.

बदलीच्या आदेशाआधीच निलंबनाची कारवाई

कर्तव्यात कसूर केल्यामुळे डीजीपी आलोक यांनी मंगळवारीच ईरन्ना यांची चिक्कमगळूर तुरुंगात बदली करण्याचे आदेश दिले होते. पण बदलीचा आदेश त्यांच्यापर्यंत पोहोचण्याआधीच सीसीबीने छापा टाकला आणि प्रज्वलच्या सेलमध्ये मोबाईल सापडला. प्रज्वलच्या विभागाच्या सुरक्षेची जबाबदारी ईरन्ना यांच्यावरच होती. त्यामुळे त्यांना तात्काळ प्रभावाने निलंबित करण्यात आलं आहे.

एअरटेल कंपनीवर एफआयआर दाखल

परप्पना अग्रहार तुरुंगात अत्याधुनिक मोबाईल जॅमर बसवलेले आहेत. तरीही, आंध्र प्रदेशमधील एअरटेलची सिम कार्ड्स मात्र कोणत्याही अडथळ्याशिवाय सुरू असल्याचं तपासात समोर आलं आहे. जॅमर असूनही एअरटेलचे सिग्नल कसे काय काम करत आहेत, यावर कंपनीच्या अधिकाऱ्यांकडून समाधानकारक उत्तर मिळालं नाही. त्यामुळे डीजीपी आलोक यांनी एअरटेल कंपनीवर एफआयआर दाखल करून कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

घरचं जेवण आणि पलंगाची सोय बंद

यापूर्वी आजारपणाचं कारण देत प्रज्वलने सेलमध्ये मिळवलेली दिवाण कॉट (पलंग) आणि न्यायालयाच्या परवानगीने मिळणारं घरचं जेवण, या दोन्ही सुविधा तुरुंग अधिकाऱ्यांनी आता पूर्णपणे बंद केल्या आहेत. प्रज्वलला आता शिक्षा झालेल्या कैद्यांचे नियम लागू होणार असल्याने, त्याचा पलंग काढून घेण्यात आला आहे आणि त्याला तुरुंगातील जेवणच खावं लागणार आहे.

या प्रकरणी सीसीबी पोलिसांनी तपास अधिक तीव्र केला असून, तुरुंगातील गैरप्रकारांना मदत करणाऱ्या आणखी काही कर्मचाऱ्यांवर कारवाई होण्याची शक्यता आहे.