
नाशिकमध्ये 4.3 रिश्टर स्केलचा भूकंप, घरांना तडे
नाशिक जिल्ह्यात 4.3 रिश्टर स्केलचा भूकंपाचा धक्का जाणवला. रात्री जेवणाच्या वेळी अचानक मोठा आवाज झाला आणि त्यानंतर जमीन हादरल्याने नागरिकांनी घराबाहेर धाव घेतली.भूकंपानंतर घरात परतल्यानंतर भिंतींना तडे गेल्याचे दिसून आले. विशेषतः दिंडोरी तालुक्यातील अनेक घरांना भेगा पडल्या आहेत. गेल्या 15 दिवसांपासून जाणवणाऱ्या किरकोळ धक्क्यांमुळेही काही ठिकाणी नुकसान झाल्याचे सांगण्यात आले.प्रामुख्याने आदिवासी भाग आणि मातीची घरे असल्याने भूकंपाच्या धक्क्यांमुळे नुकसान होण्याची शक्यता अधिक आहे. सध्या मोठी जीवितहानी किंवा मालमत्तेचे मोठे नुकसान झाल्याची माहिती नाही. मात्र, परिस्थितीची पाहणी करण्यासाठी अद्याप सरकारी अधिकारी पोहोचले नसल्याचे स्थानिकांकडून सांगण्यात आले.