Narendra Modi Creates New Record : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात निवडून आलेल्या सरकारचे प्रमुख म्हणून सर्वाधिक काळ काम करण्याचा विक्रम केला आहे. गुजरातचे मुख्यमंत्री आणि पंतप्रधान म्हणून त्यांनी एकूण ८,९३१ दिवस पूर्ण केले आहेत.
Narendra Modi Creates New Record : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक नवा विक्रम आपल्या नावावर केला आहे. गुजरातचे मुख्यमंत्री आणि देशाचे पंतप्रधान म्हणून त्यांनी सलग ८,९३१ दिवस पूर्ण केले आहेत. यासोबतच, ते भारतात निवडून आलेल्या सरकारचे सर्वात जास्त काळ प्रमुख राहिलेले नेते ठरले आहेत.
याआधी हा विक्रम सिक्कीमचे माजी मुख्यमंत्री पवन कुमार चामलिंग यांच्या नावावर होता. चामलिंग यांनी ८,९३० दिवस सरकारचे प्रमुख म्हणून काम पाहिलं होतं. मोदींनी आता त्यांचा हा विक्रम मोडला आहे.
मोदींनी ७ ऑक्टोबर २००१ रोजी गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. २६ मे २०१४ पर्यंत ते या पदावर होते. त्यानंतर त्यांनी देशाचे पंतप्रधान म्हणून सूत्रं हाती घेतली. तेव्हापासून आजपर्यंत ते एकाही दिवसासाठी सत्तेबाहेर राहिलेले नाहीत.
मोदींच्या या कामगिरीबद्दल गृहमंत्री अमित शाह यांच्यासह अनेक नेत्यांनी त्यांचं अभिनंदन केलं आहे.
इतरही अनेक विक्रम मोदींच्या नावावर
आपल्या राजकीय कारकिर्दीत पंतप्रधान मोदींनी अनेक विक्रम केले आहेत. त्यापैकी काही महत्त्वाचे विक्रम खालीलप्रमाणे:
- गुजरातचे सर्वात जास्त काळ मुख्यमंत्री राहण्याचा विक्रम.
- मुख्यमंत्री म्हणून सर्वाधिक अनुभव असलेले पंतप्रधान होण्याचा मान.
- स्वातंत्र्यानंतर जन्मलेले ते भारताचे पहिले पंतप्रधान आहेत.
- सलग ३ लोकसभा निवडणुका जिंकणारे पंतप्रधान.
- लोकसभेत पूर्ण बहुमत मिळवणारे पहिले गैर-काँग्रेसी नेते.
- दोन पूर्ण कार्यकाळ पूर्ण करून सलग तिसऱ्यांदा सत्तेत परतणारे पहिले गैर-काँग्रेसी पंतप्रधान.
या वर्षाच्या सुरुवातीलाच मोदींनी डिजिटल प्लॅटफॉर्मवरही अनेक टप्पे गाठले होते. त्यांच्या यूट्यूब चॅनलचे ३ कोटी सबस्क्रायबर्स झाले, तर इन्स्टाग्रामवर त्यांचे १ कोटी फॉलोअर्स आहेत. यामुळे ते जागतिक स्तरावर एक प्रभावी नेते म्हणून ओळखले जातात.
मोदींचा प्रवास एका नजरेत:
- १४ वर्षे गुजरातचे मुख्यमंत्री, ११ वर्षे पंतप्रधान
- २००१ ते २०१४ पर्यंत गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून काम
- त्यानंतर सलग ११ वर्षांपासून देशाचे पंतप्रधान
- १९९४ ते २०१९ पर्यंत सिक्कीमचे मुख्यमंत्री राहिलेल्या चामलिंग यांचा विक्रम मोडला
- सलग ३ लोकसभा निवडणुका जिंकण्याचा विक्रम
- सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान होणारे पहिले गैर-काँग्रेसी नेते


