
नंदूरबारमध्ये विद्यार्थ्यांचा बाबूंच्या धोकादायक पुलावरून प्रवास
महाराष्ट्रातील नंदूरबार जिल्ह्यातील डाब ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या 6 आदिवासी पाड्यांना जोडणारा बाबूंचा धोकादायक पूल सध्या नागरिकांसाठी एकमेव मार्ग ठरला आहे. या सहा पाड्यांमध्ये सुमारे 1 हजार 900 लोक राहतात. विद्यार्थी दररोज याच धोकादायक पुलावरून प्रवास करत आहेत.गर्भवती महिलांना रुग्णालयात नेताना तसेच सर्पदंशासारख्या आपत्कालीन परिस्थितीत वैद्यकीय सेवेसाठीही या पुलाचा वापर करावा लागतो. मात्र, पक्का रस्ता आणि पूल बांधण्यासाठी वनविभागाची परवानगी आवश्यक असल्याने या भागातील पायाभूत सुविधांचा प्रश्न कायम आहे.ग्रामपंचायतीने पूल बांधण्यासाठी प्रस्ताव दाखल केला असला तरी वनविभागाकडून याकडे लक्ष दिलं जात नसल्याचा आरोप आहे. त्यामुळे सहा आदिवासी पाड्यांतील नागरिकांना अजूनही बाबूंच्या धोकादायक पुलावरून प्रवास करावा लागत आहे.