
Marathi
मुंबईतील टॅक्सी चालकांसाठी मराठीत बोलण्याची सक्ती केली जात असताना अनेक चालक मराठी शिकण्याला विरोध नसल्याचे सांगत आहेत. मात्र शिकवलेल्या सिलॅबसच्या बाहेर प्रश्न विचारल्यास गोंधळ उडतो आणि मराठी बोलताना चूक झाल्यास दंडात्मक कारवाई होत असल्याची त्यांची तक्रार आहे.मुंबईच्या दैनंदिन प्रवासात टॅक्सीचे महत्त्व मोठे आहे. मीटरनुसार भाडे आकारले जात असल्याने सर्वसामान्यांसाठी हा प्रवास परवडणारा ठरतो. पहिल्या एक किलोमीटरसाठी 31 रुपये आकारले जातात. मात्र उत्पन्न कमी होत असल्याने टॅक्सी व्यवसायात पुढची पिढी येण्यास तयार नसल्याचे चालक सांगतात. दुसरीकडे ओला-उबरच्या तुलनेत पारंपरिक टॅक्सीच्या भाड्याचा मुद्दाही उपस्थित केला जात आहे.मराठी शिकण्यास विरोध नसून सक्तीच्या नावाखाली त्रास देऊ नये, अशी चालकांची मागणी आहे. टॅक्सीवरच कुटुंबाचा उदरनिर्वाह अवलंबून असल्याचेही चालक सांगतात. पुण्यासारख्या शहरांमध्ये मीटरने रिक्षा-टॅक्सी चालवण्याच्या नियमांची अंमलबजावणी करण्याची मागणीही करण्यात आली आहे.रेल्वे स्थानकांवर रात्री आणि पहाटे काही चालकांकडून दोन ते तीन पट भाडे आकारले जात असल्याचाही मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे. कमी उत्पन्न, वाढता त्रास आणि युनियनकडून अपेक्षित साथ मिळत नसल्याने भविष्यात मुंबईतील पारंपरिक टॅक्सींची संख्या मोठ्या प्रमाणात कमी होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.