LPG Supply Disruption John Brittas Slams Central Government : सीपीआय(एम) खासदार जॉन ब्रिटास यांनी एलपीजी पुरवठा संकटावरून केंद्रावर टीका केली आहे. 'हे युद्ध आता प्रत्येक घरात पोहोचलंय,' असं ते म्हणाले. सरकारच्या निष्काळजीपणावर त्यांनी बोट ठेवलं, तर जम्मू-काश्मीरच्या मंत्र्यांनी राज्यात तुटवडा नसल्याचं म्हटलं आहे.

LPG Supply Disruption John Brittas Slams Central Government : भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे (मार्क्सवादी) खासदार जॉन ब्रिटास यांनी एलपीजी पुरवठा साखळी विस्कळीत झाल्याबद्दल केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. सरकारने यावर तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी त्यांनी केली. या संकटामुळे लोकांच्या रोजगारावर परिणाम होत असल्याचं सांगत, 'हे युद्ध आता देशातील प्रत्येक स्वयंपाकघरात पोहोचलं आहे,' असं ते म्हणाले. गॅसच्या साठ्याबद्दल मोदी सरकारने दिलेल्या आश्वासनांवरही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं.

मध्य-पूर्वेतील तणावाच्या पार्श्वभूमीवर तिथे राहणाऱ्या भारतीयांच्या सुरक्षेबद्दल आणि रोजगाराबद्दलही त्यांनी चिंता व्यक्त केली. एएनआयशी बोलताना ते म्हणाले, "पंतप्रधानांनी केरळमध्ये केलेली भाषणं आणि देशातील वास्तव यात खूप फरक आहे. हे युद्ध आता देशातील प्रत्येक घरात पोहोचलं आहे. गॅसच्या तुटवड्यामुळे रेस्टॉरंट्स बंद होत आहेत. याचा परिणाम प्रत्येक क्षेत्रावर होतोय. सरकारने पुरेसा साठा असल्याचं आश्वासन दिलं होतं. पण आज सरकारच्या निष्काळजीपणामुळे खरं संकट उभं राहिलं आहे. एक कोटी भारतीय आखाती देशांमध्ये आहेत आणि आम्हाला त्यांच्या सुरक्षेची आणि रोजगाराची चिंता आहे. युद्धामुळे त्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. सरकारने यावर तातडीने पावलं उचलावीत, अशी आमची इच्छा आहे."

जम्मू-काश्मीरमध्ये तुटवडा नाही: मंत्री

मात्र, जम्मू आणि काश्मीरच्या मंत्री सकिना इटू यांनी राज्यात एलपीजीचा कोणताही तुटवडा नसल्याचं स्पष्ट केलं. पत्रकारांशी बोलताना त्या म्हणाल्या, "जम्मू-काश्मीरमध्ये अशी कोणतीही परिस्थिती नाही. आमच्याकडे एलपीजीचा तुटवडा नाही. जेव्हा असं काही घडतं, तेव्हा सरकार मदतीला असतंच."

एलपीजी दरवाढ आणि नवे नियम

पश्चिम आशियातील संघर्ष सुरू असतानाच, केंद्राने नुकतीच घरगुती एलपीजी सिलेंडरच्या दरात ६० रुपयांची वाढ जाहीर केली होती. यानंतर या प्रतिक्रिया येत आहेत. या दरवाढीनंतर विना-अनुदानित सिलेंडरचे दर दिल्लीत ९१३ रुपये, कोलकात्यात ९३९ रुपये, मुंबईत ९१२ रुपये आणि चेन्नईमध्ये ९२८ रुपये झाले आहेत. वेगवेगळ्या राज्यांमध्ये राज्य सरकारकडून लावण्यात येणाऱ्या करांमुळे दरांमध्ये हा फरक दिसतो.

सरकारने घरगुती एलपीजी रिफिलसाठी दोन बुकिंगमध्ये किमान २५ दिवसांचं अंतर अनिवार्य केलं आहे.