सार
बिहारहून मुंबईला जाणाऱ्या रेल्वेत प्रवाशांनी रेल्वेच्या काचा फोडल्याची घटना घडली आहे. रेल्वे गर्दीने भरलेली असल्याने आतील प्रवाशांनी दरवाजे बंद केले होते, ज्यामुळे बाहेरील प्रवाशांचा संताप झाला.
भारतात सार्वजनिक मालमत्तेचे रक्षण करण्यासाठी कोणतेही कठोर कायदे नाहीत, म्हणूनच लोक सार्वजनिक वस्तूंची मनमानी करतात. याचे उत्तम उदाहरण म्हणजे सरकारी बसस्थानके, सरकारी बसेस, सरकारी रुग्णालये. आपण भरलेल्या करातूनच या सार्वजनिक मालमत्तेची निर्मिती होते हे किमान ज्ञानही अनेकांना नसते. म्हणूनच सार्वजनिक मालमत्तेचे बेकायदेशीरपणे नुकसान करून लाखो रुपयांचे नुकसान करतात. त्याचप्रमाणे येथे एका ठिकाणी प्रवाशांनी रेल्वे गर्दीने भरलेली असल्याने आतून कुलूप लावले, ज्यामुळे संतप्त झालेल्या बाहेरील लोकांनी रेल्वेच्या खिडक्यांचे काच दगडांनी फोडले. तसेच दरवाजाच्या काचाही कठीण वस्तूने फोडून नुकसान केले.
बिहारच्या छपराहून मुंबईला जाणाऱ्या अंत्योदय एक्सप्रेस रेल्वेत ही घटना घडली. मंगळवारी रात्री रेल्वे बस्ती रेल्वे स्थानकावर पोहोचली. यावेळी रेल्वे आत प्रवाशांनी गजबजलेली होती. त्यामुळे आतील लोकांनी बाहेरून आणखी लोक येऊ नयेत म्हणून रेल्वेचा दरवाजा आतून बंद केला. यामुळे बाहेर असलेल्या लोकांचा संताप झाला. सार्वजनिक मालमत्ता असल्याचा विचार न करता लोकांनी मोठमोठे दगड घेऊन रेल्वेच्या दरवाज्याचे काच, खिडक्यांचे काच फोडले. बाहेरचे लोक इतके संतप्त झाले होते की त्यांनी खिडकीतील लोखंडी रॉडही वाकवून तोडल्या. याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून लोकांच्या संयमाच्या अभावावर तीव्र संताप व्यक्त होत आहे.
सार्वजनिक मालमत्तेचे इतके सहज नुकसान झाल्याबद्दल लोक नाराजी व्यक्त करत आहेत. घटनेसंदर्भात रेल्वे सुरक्षा दलाने बस्तीत रेल्वे कायदा १४५ अन्वये अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. रेल्वे अधिकाऱ्यांच्या मते, रेल्वे गर्दीने भरलेली होती आणि आतील प्रवाशांनी रेल्वेचा दरवाजा आतून बंद केला होता, ज्यामुळे बाहेरील लोकांचा संताप अनावर झाला आणि रेल्वेच्या खिडक्या आणि दरवाजे फुटले. एकाने रेल्वेच्या खिडक्यांचे आणि दरवाज्याचे काच फोडले तर इतरांनी रेल्वेच्या लोखंडी रॉडही वाकवून आत शिरले, असे त्यांनी सांगितले. घटनेचा तपास सुरू असून अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. घटनेसंदर्भात वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त चंद्र मोहन यांनी प्रतिक्रिया दिली असून, आम्हाला तोडफोडीचा व्हिडिओ मिळाला आहे, या प्रकरणात सहभागी असलेल्यांचा शोध घेत आहोत, असे त्यांनी सांगितले.
व्हिडिओमुळे सार्वजनिक क्षेत्रात तीव्र संताप व्यक्त होत आहे. अशा मानसिकतेचे लोक असताना देश कसा प्रगती करेल, असा प्रश्न एकाने उपस्थित केला आहे. तसेच देशाला केवळ चांगले सरकारच नव्हे तर चांगले नागरिकही हवे असल्याचे एका व्यक्तीने म्हटले आहे. असे लोकच बुलेट ट्रेन हवी असल्याचे म्हणतात, अशीही एक टिप्पणी आली आहे. या घटनेबद्दल तुमचे काय मत आहे ते कमेंट करा.