दोन मोठ्या हॉटेल्समध्ये FSSAI ने केलेल्या तपासणीत धक्कादायक प्रकार समोर आला आहे. किचनमध्ये झुरळं, माश्या, दुर्गंधी आणि कालबाह्य झालेले पदार्थ सापडले. तब्बल ८७ किलो कालबाह्य मिठाई नष्ट करण्यात आली.
नवी दिल्ली : भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण (FSSAI) ने दिल्लीच्या एअरोसिटी भागातील दोन मोठ्या हॉटेल्सच्या किचनची तपासणी केली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या तपासणीत किचनमध्ये दुर्गंधी, झुरळं आणि माश्या आढळून आल्या.
दिल्ली एअरोसिटी हॉटेल्समध्ये स्वच्छतेचा बोजवारा
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, "किचनमध्ये व्हेज आणि नॉन-व्हेज पदार्थ वेगळे ठेवण्यात आले नव्हते. तसंच, झुरळं, माश्या आणि दुर्गंधीबद्दलही तक्रारी नोंदवण्यात आल्या."
"काही ब्रेडच्या पॅकेटवरची मुदत संपलेली होती. कन्फेक्शनरी विभागात तब्बल ८७ किलो कालबाह्य मिठाई सापडली, जी जागीच नष्ट करण्यात आली. पेस्ट्री विभागातही मुदत संपलेले केक बेस, माश्या आणि झुरळं सापडली."
एअरोसिटीमधील दुसऱ्या एका हॉटेलमध्ये केलेल्या तपासणीतही अनेक त्रुटी आढळून आल्याचं सूत्रांनी सांगितलं. “ही तपासणी जवळपास दोन दिवस चालली, ज्यामध्ये एकूण ५९ त्रुटी नोंदवण्यात आल्या,”
सूत्रांनी पुढे माहिती दिली की, "काही खाद्यपदार्थांसाठी आवश्यक असलेले FSSAI परवाने किंवा एंडोर्समेंट उपलब्ध नव्हते. पॅकेज केलेल्या खाद्यपदार्थांच्या लेबलिंगमध्येही अनियमितता आढळली. सडलेले सफरचंद आणि खराब झालेले टोमॅटो सापडले. अनेक खाद्यपदार्थ उघड्यावर ठेवले होते, तर व्हेज आणि नॉन-व्हेज पदार्थांच्या साठवणुकीतही त्रुटी होत्या. बेकरीमध्ये झुरळं आणि तुटलेली भांडी सापडली."
महाराष्ट्रातही एफडीएची मोठी कारवाई
देशभरातील विविध राज्यांमध्ये अशा प्रकारच्या तपासण्या सुरू असतानाच ही कारवाई झाली आहे. महाराष्ट्रात अन्न आणि औषध प्रशासनाने (FDA) या महिन्याच्या सुरुवातीला छत्रपती संभाजीनगरमधील क्रांती चौकातील एका प्रसिद्ध हॉटेलचा FSSAI परवाना तात्काळ प्रभावाने निलंबित केला.
"सुरक्षित अन्न, सुरक्षित महाराष्ट्र" या मोहिमेअंतर्गत केलेल्या अचानक तपासणीत स्वच्छतेच्या गंभीर त्रुटी आणि आरोग्यासाठी मोठे धोके आढळून आल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. तपासणी अधिकाऱ्यांना किचनमध्ये कापलेले, कुजलेल्या वासाचे पनीर सापडले, जे जेवण बनवण्यासाठी तयार ठेवले होते. त्यावर कोणतीही मुदत किंवा 'यूज-बाय' तारीख नव्हती. जास्त आर्द्रता आणि प्रोटीनमुळे खराब झालेले पनीर आरोग्यासाठी अत्यंत धोकादायक ठरू शकते.

