अमन कुमार नावाच्या पतीने पत्नी गुंजन कुमारीच्या शिक्षणाचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मजुरी केली, जमीन विकली. पण चांगली नोकरी लागताच पत्नीने पतीलाच नाकारलं आणि दुसऱ्या व्यक्तीसोबत अफेअर सुरू केलं. पत्नीच्या या फसवणुकीमुळे अमन कुमार आता न्यायासाठी लढत आहे.
नवी दिल्ली : तिचं नाव गुंजन कुमारी. तिला शिकायची खूप इच्छा होती. पण वडिलांनी तिचं लग्न लावून दिलं. मात्र, तिच्या शिक्षणाच्या स्वप्नाला खरा आधार दिला तो तिचा नवरा अमन कुमार याने. चांगले मार्क्स मिळूनही घरच्यांनी पुढे शिकायला पाठवलं नाही, असं दुःख तिने नवऱ्याकडे बोलून दाखवलं. तेव्हा आपल्या पत्नीने शिकावं, तिचं स्वप्न पूर्ण करावं, ही एकच इच्छा अमनच्या मनात होती. पण पत्नीच्या शिक्षणासाठी लागणारे पैसे त्याच्याकडे नव्हते. म्हणून त्याने मिळेल ते काम केलं. पैसे कमी पडू लागल्यावर मजुरीही केली. तरीही पैशांची जुळवाजुळव होत नव्हती, तेव्हा त्याने स्वतःच्या वाटणीची छोटी जमीनही विकली. हे सगळं फक्त बायकोसाठी, तिच्या शिक्षणाचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी.
या काळात त्यांना एक मूलही झालं. बघता बघता लग्नाला १० वर्षं झाली. पतीच्या कष्टाचं अखेर चीज झालं. २०१३ मध्ये लग्न झालेल्या या जोडप्याच्या आयुष्यात २०२४ हे वर्ष महत्त्वाचं ठरलं. गुंजनला एक चांगली नोकरी मिळाली. ती कामावर जाऊ लागली. तिथे तिची नवीन लोकांशी ओळख झाली. मोठं पद मिळाल्यावर तिच्यात अहंकार आला. घरात मजुरी करणारा नवरा तिला नकोसा झाला. आपला नवरा एवढं साधं काम करतो, हे सांगायलाही तिला लाज वाटू लागली. घरात १० वर्षांचं मूल असतानाही, तिने ऑफिसमधल्याच एका व्यक्तीसोबत अफेअर सुरू केलं. कदाचित तिने आपलं लग्न झाल्याचंही त्याला सांगितलं नसेल.
पत्नीचं अफेअर
त्या दोघांचं नातं इतकं पुढे गेलं की ते लिव्ह-इनमध्ये एकत्र राहू लागले. आपल्या पत्नीमध्ये होत असलेले बदल अमनला दिसत होते, पण ती इतकी फसवेल असं त्याला वाटलंच नाही. नंतर कुणीतरी ही गोष्ट अमन कुमारच्या कानावर घातली, पण सुरुवातीला त्याचा विश्वासच बसला नाही. अखेर, पत्नी कुठे राहते याचा पत्ता काढून तो तिथे पोहोचला. तिथे एक कार उभी होती. अमनने त्या कारचा व्हिडिओ बनवला आणि गेट उघडून आत गेला. पण आतलं दृश्य पाहून त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. तिथे त्याची पत्नी आणि तो माणूस अशा अवस्थेत होते, जे त्याला पाहवलं नाही.
नवऱ्याला मारायला चप्पल घेऊन आली पत्नी
काय करावं हे न सुचल्याने अमन कुमार त्या व्यक्तीची वाट पाहत त्याच्या गाडीजवळ थांबला. तो त्याचं काम संपवून गाडीजवळ येताच अमनने त्याला अडवलं. तोपर्यंत त्या व्यक्तीलाही गुंजनचं लग्न झाल्याचं कळलं होतं. हाच तिचा नवरा आहे हे कळताच त्याने अमनवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. बाहेरचा गोंधळ ऐकून नवरा आल्याचं पाहताच गुंजन कुमारी घरातून चक्क नवऱ्याला मारायला चप्पल घेऊन आली. आता अमन कुमारने कोर्टात केस दाखल केली आहे. त्याने पत्नीपासून वेगळं होण्याचा निर्णय घेतला आहे. त्याआधी त्याने पत्नीची सगळी कहाणी मीडियासमोर मांडून आपलं दुःख व्यक्त केलं आहे.

