
Pankaja Munde
पावसाने मारलेल्या मोठ्या खंडीमुळे बीड जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून शेतातील उभी पिके डोळ्यांदेखत करपून जात आहेत. या गंभीर परिस्थितीची दखल घेत राज्याच्या मंत्री पंकजा मुंडे गेल्या दोन दिवसांपासून बीड जिल्ह्याच्या टंचाई आणि दुष्काळ पाहणी दौऱ्यावर आहेत. आज त्यांनी केज विधानसभा मतदारसंघातील डिघोळ अंबा आणि कोदारी परिसराला भेट देऊन वाळलेल्या पिकांची प्रत्यक्ष पाहणी केली व बाधित शेतकऱ्यांशी थेट संवाद साधला. "पावसाने ओढ दिल्यामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. परंतु या कठीण प्रसंगात बळीराजाने खचून जाऊ नये, सरकार पूर्णपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. त्यामुळे कोणीही आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलू नये," असे भावूक आवाहन मंत्री पंकजा मुंडे यांनी या वेळी बोलताना केले. पावसाअभावी केवळ पिकांचेच नुकसान झालेले नाही, तर येत्या काळात ग्रामीण भागात पिण्याचे पाणी आणि जनावरांच्या चार्याचा यक्षप्रश्न भेडसावणार आहे. शेतकऱ्यांनी या समस्या पंकजा मुंडे यांच्यासमोर मांडल्या. यावर बोलताना, प्रशासनाला तातडीने परिस्थितीची गांभीर्यपूर्वक दखल घेण्याच्या सूचना देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.