देवेंद्र फडणवीस: जरांगेंशी चर्चेतून मार्ग काढू

Share this Video

देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरजवळील बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा झू आणि रेस्क्यू सेंटरचा आढावा घेतला. पुढील वर्षापर्यंत आफ्रिकन सफारी सुरू करण्याचा प्रयत्न असून ‘बिग फाइव्ह’ प्राणी हे त्याचे मोठे आकर्षण ठरतील, असे त्यांनी सांगितले. रेस्क्यू सेंटरमध्ये पशुवैद्यकीय डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांना प्रशिक्षणाची संधी उपलब्ध असल्याचेही त्यांनी नमूद केले. वनमंत्री गणेश नाईक यांच्यासोबत पुढील टप्प्यातील कामे, पर्यटनासाठी हॉटेल आणि इतर सुविधांबाबत बैठक होणार असल्याचे फडणवीस म्हणाले.विदर्भातील मानव-वाघ संघर्षाबाबत बोलताना AI आधारित ‘अर्ली वॉर्निंग सिस्टीम’ तयार करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. विविध प्राण्यांकडून मिळणाऱ्या संकेतांसह इतर माहितीच्या आधारे वाघाच्या उपस्थितीची पूर्वसूचना मिळून नागरिकांना सुरक्षित ठेवण्यास मदत होईल, असे त्यांनी सांगितले.परभणीतील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे यांच्या इशाऱ्याबाबत विचारले असता, आंदोलनाबाबत चर्चा करण्यासाठी सरकारचे प्रतिनिधी उपस्थित असून यापूर्वीही मार्ग काढला आहे आणि यापुढेही मार्ग काढू, असे फडणवीस म्हणाले. एकनाथ शिंदे या प्रक्रियेत सुरुवातीपासून संवेदनशीलतेने काम करत असल्याचेही त्यांनी सांगितले. कायदेशीर, संविधानाच्या चौकटीतील आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे उल्लंघन न करणाऱ्या मागण्यांसाठी चर्चेची दारे खुली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.समृद्धी महामार्गावरील लुटीची घटना गांभीर्याने घेतल्याचे सांगत विशेष टास्क फोर्स तयार करून कारवाई करण्याचे निर्देश दिल्याची माहिती फडणवीस यांनी दिली. तसेच अडकलेल्या प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढणे हे सरकारचे कर्तव्य असल्याचे सांगत, जगात कुठेही भारतीय अडचणीत असेल तर भारताने त्याच्यापर्यंत पोहोचले पाहिजे, असे ते म्हणाले. महाराष्ट्रातील अडकलेल्या नागरिकांना शोधून सुरक्षितपणे त्यांच्या गंतव्यस्थानी पोहोचवण्याचा प्रयत्न केल्याचेही त्यांनी सांगितले.

Related Video