देशभरात काँग्रेसची निदर्शने सुरू असतानाच राहुल गांधी खाजगी दौऱ्यासाठी व्हिएतनामला गेले आहेत. यावरून भाजपने त्यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. विमानात प्रवास करणाऱ्या एका व्यक्तीचा व्हिडिओ शेअर करत भाजपने त्यांच्यावर टीका केली.

नवी दिल्ली : देशभरात काँग्रेसची निदर्शने सुरू असतानाच विरोधी पक्षनेते राहुल गांधी व्हिएतनामच्या दौऱ्यावर गेले आहेत. यावरून भाजपने त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे. खोटे पसरवल्यानंतर राहुल गांधी खाजगी दौऱ्यासाठी परदेशात गेल्याचा आरोप करत भाजपने त्यांच्या अधिकृत एक्स (X) अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. 'खोटं बोलून मी थकलोय... काही दिवस व्हिएतनाममध्ये फिरून येतो... हे कोणालाही समजणार नाही!' अशा शब्दांत भाजपने आपल्या पोस्टमधून त्यांची खिल्ली उडवली आहे.

भाजपने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये बिझनेस क्लासमध्ये निळा टी-शर्ट घातलेली एक व्यक्ती प्रवास करताना दिसत आहे. व्हिडिओतील इतर प्रवासी ही व्यक्ती राहुल गांधी असल्याचं बोलताना ऐकू येतं. पण, या व्हिडिओतील व्यक्तीची किंवा प्रवासाच्या ठिकाणाची अधिकृत पुष्टी अद्याप झालेली नाही.

'द इंडियन एक्सप्रेस'ने काँग्रेसच्या सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, राहुल गांधी खाजगी कामासाठी चार दिवसांच्या व्हिएतनाम दौऱ्यावर गेले आहेत. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर गोव्यात काँग्रेसच्या 'गोय राखोण यात्रे'त सहभागी झाल्यानंतर ते या दौऱ्यावर गेले. मतदार यादीतील गैरव्यवहाराचा आरोप करत मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात इंडिया आघाडीच्या नेतृत्वाखाली सर्वोच्च न्यायालयावर 'मार्च फॉर डेमोक्रसी' काढण्यात आला. अशातच राहुल गांधी परदेश दौऱ्यावर गेल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.

राहुल गांधींच्या दौऱ्याला काँग्रेसचा पाठिंबा

काँग्रेसने राहुल गांधींच्या व्हिएतनाम दौऱ्याचं जोरदार समर्थन केलं आहे. खाजगी वेळेत कुठेही प्रवास करण्याचा त्यांना पूर्ण अधिकार असल्याचं पक्षाने स्पष्ट केलं. राहुल गांधींना खाजगी आयुष्यासोबतच विरोधी पक्षनेता म्हणूनही जबाबदाऱ्या आहेत. परदेश दौऱ्यात ते विद्यार्थी आणि विचारवंतांच्या भेटी घेतात, ज्याचा देशाला फायदाच होतो, अशी प्रतिक्रिया काँग्रेस नेते संदीप दीक्षित यांनी दिली. राहुल गांधी नेहमीच माध्यमांशी बोलायला तयार असतात, पण पंतप्रधान नरेंद्र मोदी तसं करतात का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. तसेच, गेल्या वर्षीच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान पंतप्रधानांनी केलेल्या परदेश दौऱ्यांवरूनही त्यांनी भाजपला धारेवर धरलं.