Balen Shah Becomes Nepals Youngest Prime Minister Modi Extends Congratulations: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नेपाळचे नवे पंतप्रधान बालेन शाह यांचं अभिनंदन केलं आहे. शाह यांनी राष्ट्रपती रामचंद्र पौडेल यांच्याकडून पदाची शपथ घेतली. शाह यांच्या नेतृत्वात भारत-नेपाळ मैत्री आणखी घट्ट होईल, असा विश्वास मोदींनी व्यक्त केला.
Balen Shah Becomes Nepals Youngest Prime Minister Modi Extends Congratulations PM मोदींकडून नेपाळचे नवे पंतप्रधान बालेन शाह यांना शुभेच्छा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी नेपाळचे नवे पंतप्रधान म्हणून शपथ घेतलेल्या बालेन शाह यांना शुभेच्छा दिल्या आहेत. भारत-नेपाळ मैत्री अधिक घट्ट करण्यासाठी त्यांच्यासोबत काम करण्यास उत्सुक असल्याचं मोदींनी म्हटलं आहे. त्यांनी 'X' या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट शेअर केली आहे. शाह यांची नियुक्ती म्हणजे नेपाळच्या जनतेने त्यांच्या नेतृत्वावर दाखवलेला विश्वास आहे आणि एकत्र काम केल्याने दोन्ही देशांमधील संबंध अधिक मजबूत होतील, असंही मोदी म्हणाले.
"नेपाळचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतल्याबद्दल श्री. बालेन शाह यांचे हार्दिक अभिनंदन. तुमची निवड नेपाळच्या जनतेने तुमच्या नेतृत्वावर दाखवलेला विश्वास दर्शवते. दोन्ही देशांच्या लोकांच्या फायद्यासाठी भारत-नेपाळ मैत्री आणि सहकार्य अधिक उंचीवर नेण्यासाठी मी तुमच्यासोबत काम करण्यास उत्सुक आहे," असं PM मोदींनी 'X' वर म्हटले आहे.
Warm congratulations to Mr. Balendra Shah on being sworn in as the Prime Minister of Nepal. Your appointment reflects the trust reposed in your leadership by the people of Nepal. I look forward to working closely with you to take India-Nepal friendship and cooperation to even… — Narendra Modi (@narendramodi) March 27, 2026
शपथविधी कार्यक्रमाची माहिती
बालेन शाह यांनी शुक्रवारी राष्ट्रपती कार्यालयात झालेल्या एका विशेष समारंभात नेपाळच्या पंतप्रधानपदाची शपथ घेतली. राष्ट्रपती रामचंद्र पौडेल यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. या कार्यक्रमाला उपराष्ट्रपती राम सहाय प्रसाद यादव, सरन्यायाधीश प्रकाश मान सिंह राऊत, नॅशनल असेंब्लीचे अध्यक्ष नारायण प्रसाद दाहाल, माजी पंतप्रधान, वरिष्ठ अधिकारी, सुरक्षा प्रमुख आणि विविध देशांचे राजदूत उपस्थित होते.
महापौर ते पंतप्रधान: बालेन शाह यांची मोठी झेप
नेपाळचे ४७ वे पंतप्रधान बनलेले बालेन शाह हे देशाचं नेतृत्व करणाऱ्या सर्वात तरुण व्यक्तींपैकी एक आहेत. अवघ्या ३५ वर्षांचे शाह हे एक स्ट्रक्चरल इंजिनिअर आहेत आणि एकेकाळी ते अंडरग्राऊंड रॅप संगीतासाठी ओळखले जायचे. २०२२ मध्ये, काळे सनग्लासेस घालणाऱ्या शाह यांनी नेपाळमधील प्रस्थापित राजकीय पक्षांना धक्का देत काठमांडूचे महापौरपद मिळवले होते. त्यावेळी 'चालण्याची काठी' या चिन्हासह अपक्ष म्हणून निवडणूक लढवत त्यांनी ६१,७६७ मतं मिळवली होती. त्यांच्या विरोधात असलेल्या नेपाळी काँग्रेसच्या सिर्जना सिंह यांना ३८,३४१ मतं, तर CPN-UML चे उमेदवार आणि माजी महापौर केशव स्थापित यांना ३८,११७ मतं मिळाली होती. आता, फक्त चार वर्षांनंतर, ते देशाच्या इतिहासातील सर्वात तरुण पंतप्रधानांपैकी एक बनले आहेत.
निवडणुकीनंतर नवीन संसदेची बैठक
दरम्यान, या महिन्याच्या सुरुवातीला झालेल्या निवडणुकीनंतर नेपाळच्या नवीन संसदेची पहिली बैठक गुरुवारी पार पडली. यामध्ये नवनिर्वाचित सदस्यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. सप्टेंबर २०२५ मध्ये झालेल्या 'जन-झेड' आंदोलनानंतर जुनी संसद बरखास्त करण्यात आली होती. प्रतिनिधीगृहाचे सर्वात ज्येष्ठ सदस्य आणि नेपाळी काँग्रेसचे खासदार अर्जुन नरसिंह केसी यांनी खासदारांना शपथ दिली. हा कार्यक्रम सिंघा दरबार येथील फेडरल संसदेच्या नवीन सभागृहात पार पडला.
निवडणूक निकाल आणि जागांचे गणित
५ मार्च रोजी झालेल्या प्रतिनिधीगृहाच्या निवडणुकीत, राष्ट्रीय स्वतंत्र पार्टी (RSP) १८२ जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष ठरला. त्याखालोखाल नेपाळी काँग्रेसला ३८, CPN-UML ला २५, नेपाळी कम्युनिस्ट पार्टीला १७, श्रम संस्कृती पार्टीला ७ आणि राष्ट्रीय प्रजातंत्र पार्टीला ५ जागा मिळाल्या.
प्रमाणशीर प्रतिनिधित्व (Proportional Representation) प्रणालीनुसार, राष्ट्रीय स्वतंत्र पार्टीला (RSP) ५७, नेपाळी काँग्रेसला (NC) २०, CPN (UML) ला १६, नेपाळी कम्युनिस्ट पार्टीला (NCP) ९ आणि श्रम संस्कृती पार्टी व राष्ट्रीय प्रजातंत्र पार्टीला (RPP) प्रत्येकी ४ जागा मिळाल्या. निवडणूक आयोगाने १६ मार्च रोजी या जागांचे निकाल जाहीर केले होते.
थेट निवडणूक (First-Past-the-Post) प्रणालीमध्ये, RSP ने १२५ जागा, NC ने १९, UML ने ९, NCP ने ८, श्रम संस्कृती पार्टीने ३, RPP ने १ जागा जिंकली, तर एक अपक्ष उमेदवार निवडून आला. घटनात्मक तरतुदींनुसार, नेपाळच्या प्रतिनिधीगृहात (कनिष्ठ सभागृह) एकूण २७५ सदस्य आहेत, ज्यापैकी १६५ थेट निवडणुकीतून आणि ११० प्रमाणशीर प्रतिनिधित्व प्रणालीद्वारे निवडले जातात.


