
रामदास आठवलेंचा रिक्षा परवाना रद्द करण्यास विरोध
केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी बोलता आले पाहिजे, या भूमिकेचे समर्थन केले. महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकली आणि बोलली पाहिजे, असे त्यांनी सांगितले. मात्र मराठी बोलता येत नसल्यामुळे रिक्षा आणि टॅक्सी चालकांचा परवाना रद्द करण्याच्या निर्णयाला त्यांनी विरोध केला.मुंबई ही कॉस्मोपॉलिटन आणि देशाची आर्थिक राजधानी असल्याचे सांगत येथे विविध राज्यांतील आणि भाषांतील लोक राहतात, त्यामुळे मराठी आणि इतर भाषांमध्ये वाद निर्माण होऊ नये, असे आठवले म्हणाले. चालकांना मराठी शिकण्यासाठी आणखी वेळ द्यावा आणि परवाना रद्द करून त्यांच्या रोजगारावर परिणाम करू नये, अशी मागणी त्यांनी केली.परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या भूमिकेला पूर्णपणे विरोध नसल्याचे स्पष्ट करत, परवाना रद्द करण्याच्या निर्णयाचा राज्य सरकार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुनर्विचार करावा, असे आठवले म्हणाले. मराठी आल्याशिवाय रिक्षा चालवता येणार नाही, ही भूमिका संविधानाच्या दृष्टीने चुकीची असल्याचा दावाही त्यांनी केला.