Jailer 2 : सुपरस्टार रजनीकांत यांच्यासमोर सिगारेट ओढण्याचा सीन देताना विद्या बालनची चांगलीच घाबरगुंडी उडाली होती. दिग्दर्शक नेल्सन दिलीपकुमार यांनी हा सीन तिसऱ्या टेकमध्ये कसा पूर्ण झाला, याचा भन्नाट किस्सा सांगितला आहे.
मुंबई : साऊथचे थलायवा रजनीकांत यांच्यासमोर उभं राहायला भल्याभल्यांना घाम फुटतो. मग एखाद्या अभिनेत्रीला पहिल्याच दिवशी त्यांच्या तोंडावर सिगारेटचा धूर सोडायचा असेल, तर तिची काय अवस्था होईल? बॉलिवूडची 'डर्टी पिक्चर' गर्ल विद्या बालनसोबत असंच काहीसं घडलंय.
रजनीकांत यांच्या तोंडावर सिगारेटचा धूर सोडताना विद्या बालन घाबरलेली
'जेलर २' मध्ये विद्या बालन रजनीकांत यांच्यासोबत स्क्रीन शेअर करत आहे. पहिल्याच दिवशी एका सीनचं शूटिंग करताना विद्या प्रचंड नर्व्हस झाली होती. तिचे हात अक्षरशः थरथर कापत होते. चित्रपटाचे दिग्दर्शक नेल्सन दिलीपकुमार यांनी स्वतः हा भन्नाट किस्सा शेअर केलाय.
रजनीकांत यांच्यासमोर विद्याची अवस्था कशी होती?
'जेलर २' मध्ये विद्या बालन 'कांता' नावाच्या भूमिकेत दिसणार आहे. एका प्रमोशनल इव्हेंटमध्ये बोलताना दिग्दर्शक नेल्सन यांनी सांगितलं की, विद्या बालनच्या इंट्रोडक्शन सीनचं शूटिंग पहिल्याच दिवशी होतं. या सीनमध्ये विद्याला एक डॅशिंग आणि स्ट्रॉंग महिला दाखवायची होती. रजनीकांत यांच्या 'टायगर मुथुवेल पांडियन' या पात्रासमोर उभं राहून न घाबरता तिला डायलॉग्स बोलायचे होते. पण एवढी डॅशिंग भूमिका साकारताना आपल्याला खूप भीती वाटत असल्याचं विद्याने आधीच सांगितलं होतं.
सिगारेट हातात घेताच विद्याचे हात थरथरले!
या सीनमागचा किस्सा सांगताना नेल्सन म्हणाले की, ट्रेलरमध्ये दिसणाऱ्या एका सीनमध्ये विद्याला रजनीकांत यांच्यासमोर उभं राहून सिगारेट ओढायची होती आणि त्यांच्या तोंडावर धूर सोडायचा होता. जेव्हा दिग्दर्शकाने तिला तसं करायला सांगितलं, तेव्हा ती प्रचंड घाबरली. सिगारेट हातात धरताना तिचे हात कापत होते. तिने सिगारेट एखाद्या लिपस्टिकसारखी पकडली होती. त्यामुळे या सीनसाठी दोन वेळा 'कट' सांगावा लागला.
तिसऱ्या टेकमध्ये सीन झाला ओके!
मॉनिटरवर विद्याचा अभिनय पाहताना, पात्राला हवा असलेला तो 'डॅशिंग' अंदाज दिसत नसल्याचं दिग्दर्शकाला जाणवलं. तिच्या डोळ्यांत भीती स्पष्ट दिसत होती. पण तिसऱ्या प्रयत्नात अखेर हा सीन एकदम परफेक्ट शूट झाला, असं नेल्सन यांनी सांगितलं. पडद्यावर रजनीकांत यांना तगडी टक्कर देणाऱ्या विद्या बालनसाठी या सीनचं शूटिंग म्हणजे एक मोठं आव्हानच होतं.
कधी रिलीज होणार 'जेलर २'?
नेल्सन दिग्दर्शित 'जेलर २' मध्ये रजनीकांत पुन्हा एकदा निवृत्त जेलर 'टायगर मुथुवेल पांडियन'च्या भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटात रम्या कृष्णन, योगी बाबू, एस. जे. सूर्या, मिथुन चक्रवर्ती, विद्या बालन आणि सूरज वेंजारामूडू यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. तर मोहनलाल, शिवराजकुमार, जॅकी श्रॉफ, विजय सेतुपती आणि हृतिक रोशन हे पाहुण्या कलाकाराच्या (कॅमिओ) भूमिकेत दिसण्याची शक्यता आहे. हा चित्रपट १५ ऑक्टोबरला चित्रपटगृहांमध्ये धडकणार आहे.


