प्रसिद्ध अभिनेत्री शकीलाला तिच्या मानेवर शस्त्रक्रिया करावी लागली, ज्यासाठी ३ लाख रुपये खर्च आला. तिने सांगितले की फोनच्या अतिवापरामुळे ही गंभीर समस्या उद्भवली. तिने चाहत्यांना आणि इतरांनाही स्क्रीन टाइम कमी करण्याचा सल्ला दिला आहे.

मुंबई : प्रसिद्ध अभिनेत्री शकीलाने नुकताच एक धक्कादायक खुलासा केला आहे. तिला मानेवर एक मोठी शस्त्रक्रिया करावी लागली असून, यासाठी तब्बल ३ लाख रुपये खर्च आल्याचं तिने सांगितलं. विशेष म्हणजे, फोनच्या अतिवापरामुळे तिच्यावर ही वेळ ओढवली. या घटनेमुळे स्मार्टफोनच्या अतिवापरामुळे होणाऱ्या आरोग्याच्या समस्या पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत.

स्मार्टफोनचा सतत आणि चुकीच्या पद्धतीने वापर केल्यामुळे तिच्या मानेच्या नसांवर गंभीर परिणाम झाला, ज्यामुळे तिला ही महागडी शस्त्रक्रिया करावी लागली. अभिनेत्रीने स्वतःचा अनुभव सांगितल्यानंतर स्क्रीन टाइम आणि मोबाईल वापरताना चुकीच्या पद्धतीने बसण्याच्या धोक्यांकडे लोकांचे लक्ष वेधले गेले आहे.

मानेच्या शस्त्रक्रियेसाठी ३ लाख रुपये

तिने तिच्या युट्यूब चॅनलवर शस्त्रक्रिया आणि फोनच्या व्यसनाबद्दल सविस्तर माहिती दिली. ती म्हणाली, "फोन ही एक खूप उपयुक्त वस्तू आहे, पण गरजेपेक्षा जास्त वापरू नका."

तिने पुढे सांगितलं, “मी बेडवर एका कुशीवर झोपून सलग चार-चार तास फोनवर गेम खेळायचे. फक्त चहा किंवा कॉफी पिण्यासाठी उठायचे. चहा पिऊन झाल्यावर पुन्हा येऊन तोच गेम खेळत बसायचे. त्यानंतर युट्यूब आणि इन्स्टाग्रामवर तासन्तास रील्स बघायचे. चुकीच्या पद्धतीने बसल्यामुळे आणि फोनच्या अतिवापरामुळे माझ्या मानेच्या मुख्य नसांवर परिणाम झाला आणि अखेर मला ऑपरेशन टेबलवर जावं लागलं.”

शकीलाला तिच्या फोनच्या व्यसनामुळे झालेल्या नुकसानीसाठी स्वतःच्या पैशातून हा खर्च करावा लागला. आपला अनुभव इतरांसाठी एक धडा ठरावा, अशी तिची इच्छा आहे. तिचा अनुभव हेच सांगतो की, स्मार्टफोनचा अतिवापर ही वरवर साधी वाटणारी गोष्ट गंभीर आणि महागड्या आरोग्य समस्यांना निमंत्रण देऊ शकते.

तिने पालकांनाही आपल्या मुलांना मोबाईल देण्याबद्दल सावध केलं. ती म्हणाली, “फोन फक्त महत्त्वाच्या कामांसाठी वापरा. माझे व्हिडिओसुद्धा पाहू नका, फक्त उपयुक्त व्हिडिओ बघा. नाहीतर तुम्हाला ३ लाख रुपये गमवावे लागतील आणि असह्य वेदनाही सहन कराव्या लागतील.”

कोण आहे शकीला?

शकीला बेगमचा जन्म चेन्नईमध्ये झाला. तिची आई चांद बेगम आंध्र प्रदेशातील नेल्लोरची, तर वडील चांदबाशा तामिळनाडूचे होते. आर्थिक परिस्थितीमुळे तिला शिक्षण अर्धवट सोडावं लागलं आणि तिने मॉडेलिंग आणि चित्रपटांमध्ये नशीब आजमावलं.

१९९५ मध्ये तिने 'प्लेगर्ल्स' (Playgirls) या तमिळ चित्रपटातून पदार्पण केलं, ज्यात सिल्क स्मितादेखील होती. पण २००० साली आलेल्या 'किन्नरा थुंबिकल' (Kinnara Thumbikal) या मल्याळम चित्रपटाने तिच्या करिअरला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलं. तिच्या करिअरच्या शिखरावर असताना, तिचे अडल्ट चित्रपट सर्व भारतीय भाषांमध्ये, इतकंच नाही तर नेपाळी, चायनीज आणि सिंहली भाषांमध्येही डब झाले होते.

निवृत्तीबद्दल...

२००२ मध्ये शकीलाने घोषणा केली की ती आता अडल्ट चित्रपट करणार नाही आणि तिने मुख्य प्रवाहातील भूमिका स्वीकारायला सुरुवात केली. तेव्हापासून तिने मोहनलाल, विजय, महेश बाबू यांसारख्या कलाकारांसोबत काम केलं. २०२३ मध्ये, नेटफ्लिक्सने 'सेक्स एज्युकेशन' (Sex Education) या वेब सीरिजच्या प्रमोशनसाठी 'शकीलाज ड्रायव्हिंग स्कूल' नावाच्या एका व्हिडिओसाठी तिला साइन केलं होतं.