"मी माझ्या आयुष्यात खूप खूश आहे, माझी काळजी करू नका," असं म्हणत रश्मिका मंदान्नाने ट्रोलर्सची बोलती बंद केलीये. विजय देवरकोंडासोबतच्या नात्यावर बोट ठेवणार्यांना तिने आपल्या खास स्टाईलमध्ये सडेतोड उत्तर दिलंय.
'कॉफी विथ करण' (Koffee With Karan) शो नंतर अभिनेत्री रश्मिका मंदान्ना आणि विजय देवरकोंडा ट्रोलर्सच्या निशाण्यावर आलेत. या शोमधील विजयच्या वागणुकीवर अनेकांनी संताप व्यक्त केला. रश्मिकाने ज्या प्रकारे विजयला प्रपोज केलं आणि त्यावर विजयने जशी रिअॅक्शन दिली, ते पाहून सोशल मीडिया युजर्स भडकले होते. 'रश्मिका लव्हज विजय, विजय लव्हज विजय' अशा कमेंट्सचा पूर आला होता. याच मुद्द्यावरून लोकांनी अनेक पोस्ट शेअर केल्या. आता या सगळ्या कमेंट्सवर रश्मिकाने सडेतोड उत्तर दिलंय.
रश्मिका मंदान्नाची मोठी पोस्ट
रश्मिकाने सोशल मीडियावर एक भलीमोठी पोस्ट शेअर केलीये. "आमचं प्रेम समजून घ्या, नाही समजलं तरी हरकत नाही," असं ती म्हणालीये. प्रेम आणि नात्याबद्दल प्रत्येकाचं स्वतःचं मत असू शकतं, यात काहीच गैर नाही. पण अलीकडेच तिच्या मुलाखतीवरून सुरू असलेली चर्चा आता मतांच्या पलीकडे जाऊन रागात बदललीये. "माझ्या आणि विजयच्या प्रोफाईलवर लोक विनाकारण कमेंट्स, सल्ले आणि मतं मांडत आहेत. लोक इतक्या ठामपणे आमच्यावर टीका करत आहेत, हे पाहून मलाही आश्चर्य वाटलं," अशी खंत तिने व्यक्त केलीये.
तुमचं प्रेम सगळ्यांच्याच कल्पनेत बसेल असं नाही. लोकांनी आमचं प्रेम नाही स्वीकारलं तरी चालेल, पण प्रत्येकाने आपल्या आयुष्यात आनंदी राहावं, असं ती म्हणाली.
लग्न म्हणजे फक्त प्रपोजल किंवा अंगठी नाही
विजय देवरकोंडासोबतच्या नात्यावर बोलताना रश्मिकाने लिहिलंय की, लग्न म्हणजे फक्त गुडघ्यावर बसून प्रपोज करणं किंवा बोटात अंगठी घालणं नसतं. आमच्यासाठी लग्न म्हणजे एकत्र आयुष्य आणि भविष्य घडवणं आहे. "मला काय हवंय, याबद्दल माझ्या मनात स्पष्टता होती. पण विजयला प्रॅक्टिकल विचार करून, आमच्या निर्णयाबद्दल खात्री करण्यासाठी थोडा वेळ हवा होता. यात चुकीचं काय आहे?" असा सवाल तिने केलाय.
ती स्वतः भावनांना जास्त महत्त्व देते, तर विजय प्रॅक्टिकल विचार करून निर्णय घेतो. हाच फरक त्यांच्या आयुष्यात एकमेकांना पूरक ठरतो, असंही तिने सांगितलं.
माझ्या नवऱ्यावर प्रेम करण्यात चुकीचं काय?
आपलं विजयवर खूप प्रेम असल्याचं रश्मिकाने पुन्हा एकदा स्पष्ट केलंय. "ज्या व्यक्तीसोबत मी लग्न करतेय, त्याच्यावरच जर माझं प्रेम नसेल, तर मग लग्न तरी का करायचं? तो माझा जोडीदार आहे, माझा मित्र आहे, माझ्या मुलांचा बाप आहे आणि म्हातारपणीही माझ्यासोबत असणारा माणूस आहे," असं ती म्हणाली. आम्ही आमच्या आयुष्याचे निर्णय स्वतः घेण्याइतके स्वतंत्र आहोत. आम्ही आमच्या मेहनतीने आयुष्य घडवलंय आणि कोणासोबत जगायचं, हा निर्णयही आमचाच आहे, असं तिने स्पष्ट केलं.
कठीण काळात विजय माझ्या पाठीशी उभा होता
सोशल मीडियावर काही लोकांनी तिला विजयपासून दूर राहण्याचा सल्ला दिला होता. अशा लोकांना टोला लगावत रश्मिकाने सांगितलं की, जेव्हा तिच्या आयुष्यात खरोखरच कठीण वेळ आली होती, तेव्हा हे लोक तिच्यासोबत नव्हते.
"जेव्हा मला शारीरिक त्रास होत होता, मी डिप्रेशनमध्ये होते, तेव्हा मला आधार आणि प्रोत्साहन देणारा माणूस विजयच होता," असं रश्मिकाने ठणकावून सांगितलं. माझ्या यशाचा आनंद साजरा करणारा, माझ्यावर प्रेम करणारा आणि माझी काळजी घेणारा जोडीदार मला हवा होता. आणि तसं प्रेम आता माझ्या आयुष्यात आहे, असं रश्मिका म्हणाली.
लग्नानंतर आपण पूर्वीपेक्षा जास्त आनंदी असल्याचं तिने सांगितलं. "माझ्यावर हवी तेवढी टीका करा, पण आमच्या घरच्यांना न ओळखता त्यांच्याबद्दल बोलणं चुकीचं आहे," असा इशाराही तिने दिला.
महिलांच्या स्वातंत्र्याबद्दल बोलताना रश्मिका म्हणाली की, फेमिनिझम (Feminism) म्हणजे दुसऱ्याला खाली खेचणं किंवा स्वतःला श्रेष्ठ दाखवणं नाही. तर, आपल्याला हवं तसं आयुष्य निवडण्याचं स्वातंत्र्य असणं आणि आपल्या आयुष्याची जबाबदारी स्वतः घेणं म्हणजे फेमिनिझम. मी माझ्या आयुष्याचा निर्णय स्वतः घेतलाय आणि त्यातून मला भरभरून प्रेम मिळालंय, असं तिने लिहिलंय.
कन्नडिगांसाठी रश्मिकाचा खास मेसेज
शेवटी, रश्मिकाने कन्नड लोकांसाठीही एक खास मेसेज दिलाय. "वा! १० वर्षांनंतरही मी तुमच्या हृदयात इतकी खोलवर रुजलेली आहे, हे जाणून खूप आनंद झाला. इतक्या वर्षांनंतरही तुम्ही मला असं सेलिब्रेट करत आहात, याचा अर्थ मी खरोखरच धन्य आहे," असं ती म्हणाली. प्रेम आणि आनंदाचा उत्सव साजरा करणाऱ्या सर्वांबद्दल तिने कृतज्ञता व्यक्त केली आणि प्रत्येकाला आनंद देणारी गोष्ट मिळो, अशी सदिच्छाही व्यक्त केली.

