दिल्लीत पकडलेल्या लॉरेन्स बिश्नोई गँगच्या शूटर्सनी अमिताभ बच्चन यांच्या घराबाहेर गोळीबार करण्याची योजना आखली होती, असा धक्कादायक खुलासा पोलिसांनी केला आहे.

दिल्ली : दिल्लीत अटक केलेल्या लॉरेन्स बिश्नोई गँगच्या दोन शूटर्सच्या निशाण्यावर बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन होते, अशी माहिती स्पेशल सेलच्या सूत्रांनी दिली आहे. बच्चन यांच्या घराबाहेर गोळीबार करण्याचा त्यांचा कट होता. तसेच सलमान खान, आमीर खान, रणवीर सिंग, कपिल शर्मा आणि गुरु रंधावा यांसारख्या स्टार्सनाही त्यांनी टार्गेट केल्याचं तपासात समोर आलं आहे. त्याचबरोबर साबरमती जेलमध्ये बिश्नोईला भेटायला आलेल्या लोकांची माहितीही दिल्ली पोलिसांनी मागवली आहे.

अटक केलेल्या शूटर्सनी चौकशीत सांगितलं की त्यांनी अमिताभ बच्चन यांच्या मुंबईतील घराबाहेर फायरिंग करण्याचा प्लॅन बनवला होता. यासाठी ही गँग मुंबईतही आली होती. नुकतंच स्पेशल सेलने विकास ठाकूर आणि दीपक सिंग यांना अटक केली आहे. मुंबई पोलिसांच्या मदतीने दिल्ली पोलिसांनी ही कारवाई केली. दीपक सिंगला मुंबईत थांबून बच्चन यांच्या घरावर हल्ला करण्याच्या सूचना मिळाल्या होत्या, अशी माहिती आहे.

हा रिपोर्ट समोर आल्यावर अमिताभ बच्चन यांनी 'एक्स'वर एक पोस्ट करत 'बचावलो' असं लिहिलं आहे. पण ही पोस्ट या हल्ल्याशीच संबंधित आहे का, हे स्पष्ट झालेलं नाही. सलमान खान, आमीर खान, रणवीर सिंग, कपिल शर्मा आणि गुरु रंधावा हे देखील त्यांच्या हिट लिस्टवर होते. हा धोका लक्षात घेऊन मुंबई पोलिसांनी या स्टार्सची सुरक्षा आधीच वाढवली आहे. दरम्यान, गुजरातच्या साबरमती जेलमध्ये लॉरेन्स बिश्नोईला भेटलेल्या लोकांची यादी दिल्ली पोलिसांनी मागवली आहे. बिश्नोई जेलमधूनच बाहेरच्या गँगला कंट्रोल करत आहे का, याचा तपास पोलीस करत आहेत. भेटायला येणाऱ्या लोकांद्वारे तो सूचना पाठवतोय का, हेही तपासलं जाणार आहे.