दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग यांनी त्यांच्या मुलीचं नाव 'देवी पदुकोण सिंग' ठेवल्याने सोशल मीडियावर नवी चर्चा सुरू झाली आहे. इन्फ्लुएन्सर समृद्धी मखिजा हिने यावर प्रश्न उपस्थित केले असून नेटकऱ्यांनी यावर संमिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत.
मुंबई : बॉलिवूड कपल दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग यांनी त्यांच्या मुलीचं नाव 'देवी पदुकोण सिंग' असं ठेवलंय. पण त्यांच्या या निर्णयावरून सोशल मीडियावर आता एकच चर्चा रंगली आहे. आई आणि वडील दोघांचंही आडनाव मुलाला देणं हे खऱ्या अर्थाने स्त्रीवादाचं (फेमिनिझम) लक्षण आहे की फक्त सोशल मीडियावर मिरवण्यासाठी केलेला हा एक दिखावा आहे? असा प्रश्न आता विचारला जातोय. या वादाची संपूर्ण इनसाईड स्टोरी काय आहे, ते जाणून घेऊया.
इन्फ्लुएन्सर समृद्धी मखिजाचा दावा काय?
प्रसिद्ध इन्फ्लुएन्सर समृद्धी मखिजा हिने एक व्हिडीओ शेअर करत या नावावर थेट प्रश्नचिन्ह उभं केलंय. तिने अगदी लॉजिकल प्रश्न विचारलाय की, जर दोन आडनावं असलेल्या व्यक्तीने पुढे जाऊन दुसऱ्या दोन आडनावं असलेल्या व्यक्तीशी लग्न केलं, तर त्यांच्या मुलाला चार आडनावं लावणार का? आणि त्याच्या पुढच्या पिढीला आठ आडनावं मिळतील का?
टीकेची झोड!
मुलाच्या नावासमोर किती आडनावं लावली आहेत, यावरून स्त्री-पुरुष समानता सिद्ध होत नाही, असं समृद्धीचं म्हणणं आहे. आजकालचा फेमिनिझम हा खऱ्या आयुष्यात बदल घडवण्यापेक्षा सोशल मीडियावर आपण किती पुरोगामी आहोत, हे दाखवण्यावरच जास्त भर देतोय, अशी सडकून टीका तिने केली आहे.
खऱ्या प्रश्नांकडे दुर्लक्ष!
वारसा हक्काचे कायदे, पॅटर्निटी लीव्ह (पितृत्व रजा) आणि बाळंतपणानंतरची सक्तीची काळजी यांसारख्या खऱ्या आणि कायदेशीर लढ्यांकडे लक्ष देण्याऐवजी, नावासारख्या फक्त दिखाव्याच्या गोष्टींवर जास्त फोकस केला जातोय. यामुळे महिलांचे खरे प्रश्न कुठेतरी मागे पडत आहेत, असा दावा मखिजाने केलाय.
इंटरनेटवर संमिश्र प्रतिक्रिया!
हा व्हिडीओ व्हायरल होताच नेटकऱ्यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली आहे. काहींनी समृद्धीच्या विचारांचं आणि तिने दिखावा व खऱ्या सक्षमीकरणातील फरक दाखवून दिल्याबद्दल कौतुक केलंय. तर दुसरीकडे, काहींनी असा युक्तिवाद केलाय की, मुलाचं नाव काय ठेवायचं हा सर्वस्वी त्या जोडप्याचा वैयक्तिक निर्णय आहे. प्रत्येक गोष्टीत मत मांडणं योग्य नाही आणि इतरांच्या निर्णयांचा आदर करणं हा सुद्धा फेमिनिझमचाच एक भाग आहे.
पुढच्या पिढीची चिंता आत्ताच कशाला?
जी पिढी अजून जन्मालाच आलेली नाही, त्यांच्या नावांबद्दल आत्ताच तर्कवितर्क लावणं चुकीचं आहे. मुलं मोठी झाल्यावर ते स्वतःच त्यांचं नाव 'देवी पीएस' किंवा 'दुआ पीएस' असं शॉर्टमध्ये लावण्याचा निर्णय घेऊ शकतात, असंही अनेकांनी म्हटलं आहे.









