कर्नाटकमधील माजी डीजीपी ओमप्रकाश यांच्या हत्येप्रकरणी त्यांच्या पत्नी आणि मुलीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पती-पत्नीमध्ये सतत भांडणे होत असल्याची माहिती शेजारी आणि नातेवाईकांनी दिली आहे.

बेंगळुरू: कर्नाटकमधील माजी डीजीपी ओमप्रकाश यांच्या हत्या प्रकरणात मोठा ट्विस्ट समोर आला आहे. या प्रकरणात पोलिसांनी ओमप्रकाश यांच्या पत्नी पल्लवी आणि मुलीला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. विशेष म्हणजे ओमप्रकाश यांच्या मुलानेच यासंदर्भात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. शेजारी आणि नातेवाईकांच्या माहितीनुसार, पती-पत्नीमध्ये सतत भांडणे होत असत.

घरातच आढळला मृतदेह

बिहारच्या चंपारणचे मूळ रहिवासी आणि 1981 बॅचचे आयपीएस अधिकारी ओमप्रकाश यांची रविवारी हत्या करण्यात आली. त्यांचा रक्ताने माखलेला मृतदेह त्यांच्या बेंगळुरू येथील निवासस्थानी आढळून आला. ओमप्रकाश यांनी 2015 मध्ये कर्नाटक राज्याचे पोलिस महासंचालक (DGP) म्हणून पदभार सांभाळला होता. निवृत्तीनंतर ते बेंगळुरूमध्येच वास्तव्यास होते. पत्नी पल्लवीसोबत त्यांचे वैवाहिक संबंध काही काळापासून तणावपूर्ण होते.

पत्नीनेच दिली पोलिसांना माहिती

रविवारी सायंकाळी पल्लवी यांनीच पोलिसांना फोन करून ओमप्रकाश यांच्या मृत्यूची माहिती दिली. पोलिस अधिकाऱ्यांनी तात्काळ त्यांच्या निवासस्थानी धाव घेतली आणि तेथे त्यांचा मृतदेह आढळून आला. पोलिस तपासात आणि शेजाऱ्यांच्या सांगण्यावरून असे समोर आले आहे की, पती-पत्नीमध्ये बराच काळ वाद सुरू होता.

पत्नीच्या मानसिक स्थितीवर शंका

प्राथमिक माहितीनुसार, पल्लवी यांच्या मानसिक स्थितीबद्दलही शंका व्यक्त केली जात आहे. भांडणानंतरच त्यांनी ओमप्रकाश यांची हत्या केली असावी, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र, याबाबत अजून अधिकृत पुष्टी झालेली नाही.

पोलिसांची कारवाई सुरू

हत्येच्या तपासासाठी पोलिसांनी पत्नी पल्लवी आणि मुलीला ताब्यात घेतले आहे. एचएसआर लेआउट पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी होसूर रोडवरील सेंट जॉन्स हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आला आहे.

खऱ्या कारणांचा शोध सुरू

अद्याप हे स्पष्ट झालेले नाही की रविवारी अशा कोणत्या घटना घडल्या की ज्यामुळे परिस्थिती इतकी बिघडली की हत्या होईपर्यंत मजल गेली. पोलीस तपास सुरू असून लवकरच अधिक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.