थंडगार पाऊस आणि ४० मैल वेगाने वाहणारा वारा यासारख्या कठोर हवामानाचा सामना करत ज्युलियाने हा लढा दिला.
आपण अनेक प्रकारचे निषेध पाहिले असतील, पण अमेरिकन पर्यावरण कार्यकर्त्या ज्युलिया बटरफ्लायचा निषेध वेगळा होता. झाड तोडण्याविरोधात निषेध म्हणून ज्युलियाने एका झाडावर तंबू टाकून दिवसानुदिवस राहिली. तब्बल ७३८ दिवस ती झाडावर राहून निषेध केला. १९९७ मध्ये जगभरातील लोकांचे लक्ष वेधून घेतलेल्या ज्युलियाचा हा निषेध १००० वर्षे जुन्या कॅलिफोर्नियातील एका रेडवुड झाडावर झाला. पॅसिफिक लंबर नावाची कंपनी झाड तोडणार होती, तेव्हा ज्युलियाने त्याच झाडावर घर करून राहण्याचा निर्णय घेतला.
१९९७ च्या १० डिसेंबर रोजी ज्युलियाने २०० फूट उंच रेडवुड झाडावर राहण्यास सुरुवात केली. थंडगार पाऊस आणि ४० मैल वेगाने वाहणारा वारा यासारख्या कठोर हवामानाचा सामना करत ज्युलियाने हा लढा दिला. एका आठवड्याचा निषेध अखेर ७३८ दिवसांचा ऐतिहासिक लढा बनला. ज्युलियाने त्या झाडाला 'लुना' असे नाव दिले होते.
ज्युलियाला लागणारे पाणी, अन्न आणि इतर आवश्यक वस्तू स्वयंसेवक सतत पुरवत होते. यामुळे तिला झाडावर राहण्यास मदत झाली. अखेर जंगलतोड आणि टिकाऊ नसलेल्या झाडतोडीच्या पद्धतींविरुद्धच्या ज्युलियाच्या लढ्याने राष्ट्रीय लक्ष वेधले. झाडावर राहताना ज्युलियाला अनेक आव्हानांचा सामना करावा लागला. पण तिने आपल्या ध्येयाप्रती नेहमीच कटिबद्धता दाखवली. याविषयी तिने रेडिओ मुलाखती दिल्या आणि जनजागृतीसाठी माध्यमांना माहिती दिली.
पर्यावरणीय समस्यांकडे माध्यमांचे आणि लोकांचे लक्ष वेधण्यासाठी ज्युलियाने कायदा मोडून ७३८ दिवस लुनावर राहिली. अखेर १९९९ च्या डिसेंबरमध्ये पॅसिफिक लंबर कंपनीने २०० फूट बफर झोनमधील सर्व झाडे वाचवण्याचे मान्य केले. ज्युलियाच्या निषेधामुळे जगभरातील लोक प्रेरित झाले. या ऐतिहासिक घटनेनंतर ज्युलिया एक प्रमुख पर्यावरण कार्यकर्त्या आणि लेखिका बनली.
१९७४ मध्ये ज्युलियाचा जन्म झाला. तिचे खरे नाव ज्युलिया लॉरेन हिल आहे. एकदा ज्युलिया आणि तिचे कुटुंब फिरत असताना एक फुलपाखरू तिच्या बोटावर आले आणि बराच वेळ तिथेच बसले. त्यानंतर ज्युलियाच्या नावासोबत 'बटरफ्लाय' हे टोपणनाव आले.