माजी अमेरिकी राष्ट्राध्यक्ष जिमी कार्टर यांचे निधन

अमेरिकेचे ३९ वे राष्ट्राध्यक्ष आणि शतायुषी जिमी कार्टर (१००) यांचे निधन झाले आहे. ते सर्वात दीर्घायुषी माजी राष्ट्राध्यक्ष म्हणून ओळखले जात होते. १९७७ ते १९८१ पर्यंत ते अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होते.

वॉशिंग्टन : अमेरिकेचे ३९ वे राष्ट्राध्यक्ष आणि शतायुषी जिमी कार्टर (१००) यांचे रविवारी निधन झाले. ते सर्वात दीर्घायुषी माजी राष्ट्राध्यक्ष म्हणून ओळखले जात होते. या वर्षाच्या सुरुवातीला त्यांनी आपला १०० वा वाढदिवस साजरा केला होता. कार्टर यांच्या पश्चात ४ मुले, ११ नातवंडे आणि १४ पणतवंडे आहेत. त्यांच्या पत्नीचे यापूर्वीच निधन झाले होते. जिमी यांचा अंत्यसंस्कार जानेवारी ९ रोजी वॉशिंग्टन येथे होणार आहे. कार्टर यांच्या निधनाबद्दल भारताचे पधानमंत्री नरेंद्र मोदी, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्यासह जगातील अनेक मान्यवरांनी शोक व्यक्त केला आहे.

१९७७ ते १९८१ पर्यंत कार्टर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होते. त्यांच्या काळात शीतयुद्ध सुरू झाले होते. नागरी हक्क आणि लिंग समानतेसाठीचा लढा अमेरिका आणि जगभरात सुरू होता. इराणचा ओलीस धरलेल्यांचा प्रश्नही त्यांच्या काळात घडला होता, १९७८ च्या इजिप्त आणि इस्रायलमधील शांतता करारात त्यांनी मध्यस्थी केली होती. तसेच, गरीब देशांसाठी त्यांनी अनेक मानवतावादी मदत दिली होती. यामुळे २००२ मध्ये त्यांना नोबेल शांतता पुरस्कार मिळाला होता.

शेंगदाणे शेतकरी होते कार्टर
राष्ट्राध्यक्ष होण्यापूर्वी कार्टर शेंगदाणे पिकवणारे शेतकरी होते आणि त्यांचे किराणा दुकान होते. ७ वर्षे ते अमेरिकन नौदलात होते आणि नंतर राजकारणात आले.

भारतात आहे कार्टर यांच्या नावाचे गाव!

आणीबाणीनंतर भारताला भेट देणारे पहिले अमेरिकन राष्ट्राध्यक्ष म्हणून जिमी कार्टर ओळखले जातात. भारताचे मित्र म्हणून त्यांनी ख्याती मिळवली होती. १९७८ मध्ये मोरारजी देसाई यांच्या काळात ते भारतात आले होते आणि भारत-अमेरिका यांच्यातील 'दिल्ली घोषणा' करारावर त्यांनी स्वाक्षरी केली होती. भारतीय संसदेत भाषण करून त्यांनी लोकशाहीचे समर्थन केले आणि हुकूमशाहीचा निषेध केला. यावेळी ते पत्नीसह दिल्लीजवळील हरियाणातील दौलतपूर नसीराबाद या गावात गेले होते. त्यांच्या भेटीनंतर गावाचे नाव कार्टरपुरी असे बदलण्यात आले. भारतातील लोकांना होणारे कष्ट अमेरिकन लोकांनाही झाले आहेत, असे ते म्हणाले होते आणि भारताच्या विकासात मदत करण्याचे आश्वासन दिले होते.

Share this article