शेतकरी इंधन उत्पादक?, गडकरींनी शेतकऱ्यांना सांगितले 'श्रीमंत' होण्याचे सूत्र!

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले की, शेतकरी केवळ अन्न उत्पादक न राहता इंधन उत्पादकही बनू शकतात. बायोफ्यूल उत्पादनातून शेतकरी श्रीमंत होऊ शकतात, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 

नागपूर: देशाचा शेतकरी एक दिवस इंधन उत्पादन करेल, विमानांना उडवण्यासाठी लागणारे एअर फ्युल तयार करेल, असे मी गेल्या पंधरा वर्षापासून बोलत होतो. शेती क्षेत्रात माझ्यासोबत काम करणारे माझे सहकारी ही साहेब काहीही बोलतात, असे बोलायचे. माझ्या पाठीमागे माझ्या वक्तव्याची खिल्ली उडवायचे, माझ्यासमोर बोलण्याची त्यांची हिंमत नव्हती, मात्र आज मला आनंद आहे की, आपल्या देशातील शेतकरी इंधन उत्पादनामध्ये बायो फ्युलच्या माध्यमातून आपला वाटा देत आहेत.

शेतकऱ्यांनो श्रीमंत व्हायचे असेल तर ‘हे’ करा : गडकरी

देशात इथेनॉलवर आधारित पेट्रोल पंप सुरू होत आहे. देशातील सर्व मोठ्या ऑटोमोबाईल कंपन्यांना मी इथेनॉल चालणारे वाहन उत्पादन करण्यास लावले आहे. शेतकरी खाद्य पिकांच्या उत्पादन करून श्रीमंत होऊ शकत नाही. तर शेतकऱ्यांनी बायोफ्यूल तयार करणाऱ्या पिकांच्या माध्यमातून इंधन उत्पादनात वाटा द्यावा, त्याच्यातून ते श्रीमंत होऊ शकतात. असा विश्वास केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी बोलताना व्यक्त केला आहे. रविवारी नागपुरात नैसर्गिक शेती या पुस्तकाचे विमोचन गडकरी यांच्या हस्ते होत असून ऍग्रो व्हिजन शेतकरी भावनाचे भूमिपूजनही पार पडणार आहे. यावेळी या कार्यक्रमात ते बोलत होते.

एकाही शेतकऱ्यांची आत्महत्या होऊ नये अशी माझी इच्छा : गडकरी

गुजरातचे राज्यपाल देवव्रत यांनी हिंदीत लिहिलेल्या नैसर्गिक शेती या पुस्तकाचे मराठी अनुवादाचे रविवारी विमोचन होत आहे. विदर्भ आणि महाराष्ट्रातील शेतकऱ्यांपर्यंत या पुस्तकाच्या माध्यमातून नैसर्गिक शेतीची माहिती पोहोचेल असा या अनुवादित पुस्तकाचा हेतू आहे. यावेळी बोलताना नितीन गडकरींनी शेतकऱ्यांना श्रीमंत व्हायचे असेल तर कोणते पीक घेतले पाहिजे याबाबत भाष्य केले आहे. नैसर्गिक शेतीच्या ज्ञानाच्या माध्यमातून महाराष्ट्र आणि विदर्भात एकही शेतकरी आत्महत्या होऊ नये, अशी इच्छा असल्याचे ही ते यावेळी म्हणाले.

रासायनिक खतामुळे प्रति व्यक्ती वय किमान दहा वर्षांनी कमी : गडकरी

माझ्या स्वतःच्या शेतीत एक एकरात पाच क्विंटल सोयाबीन होत होता. मात्र परदेशात यापेक्षा अनेक पटींनी सोयाबीनचे उत्पादन होत होते. त्यामुळे कृषी विद्यापीठाकडून माझी अपेक्षा होती की विदर्भात आणि महाराष्ट्रात प्रती एकर उत्पादन वाढले पाहिजे. नैसर्गिक शेतीच्या ज्ञानाच्या माध्यमातून माझ्या शेतीत एका एकरात पाच क्विंटल एवजी यंदा अकरा क्विंटलपर्यंत सोयाबीन उत्पादन झाले आहे. त्याच पद्धतीने माझ्या स्वतःच्या शेतात प्रति एकरात ऊस उत्पादन ही लक्षणीयरित्या वाढले आहे. यशस्वी शेतीचे सूत्र हेच आहे की, उत्पादन खर्च कमी करून प्रति एकर उत्पादन वाढवणे. शेतीमध्ये कीटकनाशक आणि रासायनिक खतामुळे मोठे नुकसान होत आहे. आपल्या देशात कीटकनाशक आणि रासायनिक खतामुळे प्रति व्यक्ती वय किमान दहा वर्षांनी कमी होत आहे, हे लक्षात ठेवा. असे मत नितीन गडकरी यांनी बोलताना व्यक्त केलय.

बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशिम, यवतमाळ आणि वर्धा या जिल्ह्यांमध्ये दहा हजार पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी आजवर आत्महत्या केली आहे. आमचे प्रयत्न आहे की, ह्या आत्महत्या थांबल्या पाहिजे. या भागात कापूस, सोयाबीन आणि संत्रा प्रमुख शेती उत्पादन आहे. या पिकांचे मूल्यवर्धन कसे होईल, याचे प्रयत्न सुरू आहे. कोणत्याही परिस्थिती एका एकरात 15 क्विंटल कापूस आणि 15 क्विंटल सोयाबीनचे उत्पादन झालेच पाहिजे. असेही नितीन गडकरी म्हणाले.

आणखी वाचा :

द्वारकाधीश मंदिरापासून ते केशी घाट मंदिरापर्यत, ही आहेत प्रसिद्ध 10 कृष्ण मंदिरे

Share this article