Voter Education : मतदान केंद्रावर न जाता तुम्ही घर बसल्या करू शकता मतदान, कसे ते जाणून घ्या

मतदानाचा दिवस म्हणजे लोकशाहीचा सर्वांत मोठा सोहळा ,मतदानाच्या दिवशी तुम्ही दुसऱ्या शहरात असाल, मतदान केंद्रावर जाऊन मत देऊ शकत नसाल, तर काय करता येतं? कोणाला घरातूनच मत देता येऊ शकेल? पोस्टानं मत कोण देऊ शकतं? त्याची प्रक्रिया काय असते, जाणून घेऊयात.

भारतात मतदानाचा दिवस म्हणजे लोकशाहीचा सर्वांत मोठा सोहळा मानला जातो. कारण हजारो लाखो नागरीक त्या दिवशी आपलं मत देतात आणि आपल्या लोकप्रतिनिधींची निवड करतात.पण मतदानाच्या दिवशी तुम्ही दुसऱ्या शहरात असाल, तुमच्या मतदान केंद्रावर जाऊन मत देऊ शकत नसाल, तर काय करता येतं?कोणाला घरातूनच मत देता येऊ शकेल? पोस्टानं मत कोण देऊ शकतं? त्याची प्रक्रिया काय असते, जाणून घेऊयात.

अपंग आणि वयस्कर व्यक्तींना मत देण्यासाठी मतदान केंद्रावर पोहोचण्यात अडचणी येऊ नयेत, यासाठी स्वयंसेवक, व्हीलचेअर्स आणि वाहतुकीची सुविधा पुरवण्याचा निवडणूक आयोगाचा प्रयत्न आहे. पण जे लोक मतदान केंद्रापर्यंत पोहचण्यास शारीरिकदृष्ट्या सक्षम नाहीत, त्यांचं काय? यंदा लोकसभा निवडणुकीतही निवडणूक आयोगानं तशी सोय केली आहे. 85 वर्षांवरील ज्येष्ठ नागरीक आणि 40 टक्क्यांहून जास्त अपंगत्वाचे निकष पूर्ण करणाऱ्या व्यक्तींना यावेळी घरून मतदान करता येणार आहे.

मतदान केंद्रांवर दिव्यांगांसाठी सुविधा :

भारतात मतदान हा लोकशाहीचा सण म्हणून साजरा केला जातो. त्यामुळे वृद्ध व दिव्यांगांनीही मतदान केंद्रावर जाऊन मतदान करणे पसंत आहे. पण अनेकदा परिस्थितीमुळे अशा लोकांना मतदान करता येत नाही. मात्र आता अशा लोकांना मदत करण्यासाठी मतदान केंद्रावर सहाय्यक आणि व्हीलचेअर तैनात करण्यात येणार आहेत. एखाद्या वृद्ध किंवा अपंग व्यक्तीची इच्छा असल्यास त्याला वाहनाने मतदान केंद्रावर आणून मतदान केल्यानंतर घरी नेण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

घरबसल्या मतदानासाठी अर्ज कसा करायचा?

त्यासाठी या व्यक्तींना फॉर्म 12 डी भरावा लागेल. तो भरून तुम्हाला इतर दस्तावेजांसोबत रिटर्निंग ऑफिसरकडे नेऊन द्यावा लागतो. त्यानंतर मतदानाच्या दिवसापूर्वी निर्धारीत वेळी मतदान केंद्राचे अधिकारी या व्यक्तींच्या घरी जातील आणि पोस्टल बॅलट भरून घेतील. यात पारदर्शकता राहावी, यासाठी ही प्रक्रिया व्हीडिओवर रेकॉर्ड केली जाईल आणि त्या मतदारसंघातल्या पक्षांनाही आधी माहिती दिली जाईल.

पोस्टानं मत कोण देऊ शकतं?

जे सरकारी कर्मचारी किंवा नोंदणीकृत पत्रकार निवडणुकीच्या दिवशी दुसरीकडे ड्यूटीवर असतात, त्यांना अशी परवानगी दिली जाते. मेट्रो, रेल्वे, वीजपुरठा विभाग,ऊर्जा विभाग , बीएसएनएल, एमटीएनएल, टपाल, दूरदर्शन, ऑल इंडिया रेडियो (आकाशवाणी), प्रेस इन्फर्मेशन ब्युरो, माहिती आणि जनसंपर्क विभाग, सरकारी आणि सहकारी दूध पुरवठ्या कंपन्या, जलपुरवठा विभाग, आरोग्य विभाग, अँब्युलन्स सर्व्हिस,  फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, सार्वजनिक बांधकाम विभाग, हवाई विभाग, एयरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया, जलवाहतूक, वाहतूक विभाग, वाहतूक पोलिस, पोलिस , तुरुंगात काम करणारे कर्मचारी, सिव्हिल डिफेन्स आणि होमगार्ड, अग्निशमन दल, आपत्ती व्यवस्थापन, एक्साईज , ट्रेझरी ऑफिस, वन विभाग, नॅशनल इनफॉर्मेटिक्स सेंटर्स, निवडणूक आयोगाकडे नोंदणी केलेले पत्रकार यातल्या ज्या कर्मचाऱ्यांना मतदानाच्या दिवशी ड्युटीमुळे मतदान करता येणार नसेल, ते पोस्टानं मतदान करू शकतात. त्याशिवाय लष्कर, हवाई दल, नौदलात काम करणाऱ्या व्यक्तींना असं मतदान करता येऊ शकतं.

Read more Articles on
Share this article