चिनी न्यूमोनियाचा भारतात शिरकाव? कोलकातामधील 10 वर्षीय मुलीला Chinese Pneumoniaची लागण

Chinese Pneumonia : कोलकातामध्ये एका 10 वर्षीय मुलीला चिनी न्यूमोनिया आजाराची लागण झाल्याचे आढळले आहे. या मुलीवर कोलकातामधील इन्स्टिट्यूट ऑफ चाइल्ड हेल्थ सेंटरमध्ये उपचार सुरू आहेत.

Harshada Shirsekar | Published : Jan 3, 2024 10:48 AM IST / Updated: Jan 03 2024, 04:24 PM IST

Chinese Pneumonia : चिनी न्यूमोनियाने भारतात शिरकाव केल्याचे दिसत आहे. कोलकातामधील 10 वर्षीय मुलीला या आजाराची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. या मुलीवर कोलकातामधील इन्स्टिट्यूट ऑफ चाइल्ड हेल्थ सेंटरमध्ये उपचार सुरू आहेत. 

'चिनी न्यूमोनिया' हा आजार दुर्मिळ प्रकारातील ‘मायकोप्लाझ्मा न्यूमोनिया’ आहे. दरम्यान ही मुलगी कोलकाताच्या दक्षिण भागातील बांसड्रोनी परिसरातील रहिवासी आहे. ताप, खोकला आणि श्वास घेण्यास त्रास होत असल्याच्या समस्येमुळे या मुलीला 25 डिसेंबर 2023 रोजी पार्क सर्कस रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. 

तपासणी केली असता मुलीला 'चिनी न्यूमोनिया'ची लागण झाल्याचे डॉक्टरांना आढळले. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये भारतात या आजारामुळे अनेकांच्या प्रकृतीत बिघाड झाला होता. कोरोना विषाणूप्रमाणेच हा देखील श्वसनसंस्थेशी संबंधित आजार आहे.

फुफ्फुसांशी संबंधित आजार असलेल्या वृद्धांना जास्त धोका

दिल्लीतील एम्स रुग्णालयातील डॉक्टरांना काही आठवड्यांपूर्वी किमान सात रुग्णांमध्ये या आजाराचा संसर्ग आढळून आला होता. यामध्ये लहान मुलांचीच संख्या अधिक होती. कोलकातामध्येही 10 वर्षांच्या मुलीला संसर्ग झाल्याचे आढळले. औषधोपचारांमुळे मुलीच्या प्रकृतीत जलदगतीने सुधारणा होत आहे.

हा आजार चीन देशातून अन्य देशांमध्ये पसरला आहे. यामुळे अमेरिकेसह अनेक देशांमध्येही श्वासोच्छवासाशी संबंधित आजाराची प्रकरणे वाढली आहेत, काही रुग्णांचा मृत्यूही झाला आहे. जे वयोवृद्ध आधीपासूनच फुफ्फुसांशी संबंधित आजाराचा सामना करताहेत, त्यांच्या आरोग्यास जास्त धोका असल्याचे म्हटले जात आहे.

मायकोप्लाझ्मा न्यूमोनिया बॅक्टेरिया

चिनी न्यूमोनिया या आजाराची लागण कोरोनासारख्या विषाणूच्या संसर्गामुळे होत नाही, हे लक्षात घ्या. या आजाराची लागण मायकोप्लाझ्मा न्यूमोनिया नावाच्या जीवाणूंच्या संसर्गामुळे होते. यामुळे प्रामुख्याने मानवी शरीरातील श्वसन प्रणालीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. एखाद्या गंभीर प्रकरणात रुग्णाच्या हृदय, मूत्रपिंड, डोळे आणि अन्य अवयवांचेही नुकसान होऊ शकते.

आणखी वाचा : 

Covid-19 JN1 Variant : नववर्षाच्या स्वागतानंतर कोरोना वाढण्याचा धोका अधिक, पुढील 15 दिवस सतर्क राहा - आरोग्यमंत्री

दरवर्षी डिसेंबर महिन्यातच COVID-19चा नवा व्हेरिएंट का आढळतो? जाणून घ्या कारणे

Heart Attack : खरंच या वेळेस जेवल्यास हृदयविकाराचा धोका कमी होतो? जाणून घ्या रीसर्चमधील माहिती

Share this article