सार
Syria Crisis: सीरियामध्ये सुरू असलेले गृहयुद्ध निर्णायक टप्प्यावर पोहोचले आहे. रॉयटर्सच्या वृत्तानुसार बंडखोरांनी राजधानी दमास्कसमध्ये प्रवेश केला आहे. सीरियन सरकारी सैन्याने त्यांच्याशी लढा दिला नाही. युद्ध लढण्याऐवजी सैन्याने माघार घेतली. राष्ट्राध्यक्ष बशर अल-असद यांनी विमानात बसून पलायन केले आहे.
सीरियन लष्कराच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, राष्ट्राध्यक्ष बशर अल-असद यांची सत्तेवरील पकड कमकुवत झाल्याने त्यांनी शहरातून अज्ञात स्थळी पलायन केले आहे. ब्रिटनस्थित सीरियन ऑब्झर्व्हेटरी फॉर ह्युमन राइट्सने सांगितले की, सीरियन सैन्य आणि सुरक्षा दलांनी दमास्कस आंतरराष्ट्रीय विमानतळावरून माघार घेतली आहे.
दमास्कसमध्ये दहशतीचे वातावरण
बंडखोरांच्या आगमनामुळे दमास्कसमध्ये दहशतीचे वातावरण आहे. शहरात अनेक ठिकाणी गोळीबार झाला आहे. असद सरकार पडण्याच्या भीतीने सरकारशी एकनिष्ठ असलेले लोक पळून जाऊ लागले आहेत. बंडखोरांनी दमास्कसच्या उत्तरेकडील कुख्यात सैदनाया लष्करी तुरुंगात प्रवेश केल्याचे जाहीर केले. येथे ठेवण्यात आलेल्या कैद्यांची सुटका करण्यात आली आहे.
बंडखोरांनी अलेप्पो आणि हमा ही प्रमुख शहरे घेतली ताब्यात
गेल्या काही दिवसांपासून सीरियात बंडखोरांची मोहीम तीव्र झाली आहे. बंडखोरांनी काही दिवसांतच अलेप्पो आणि हमा ही प्रमुख शहरे ताब्यात घेतली आहेत. युद्धातील पराभव पाहून सरकारी सैन्य मागे हटू लागले आहे. अनेक शहरे बंडखोरांनी गोळीबार न करता ताब्यात घेतली आहेत. काही ठिकाणी स्थानिक लोकांनी बंडखोरांचे स्वागत केले.
शनिवारी बंडखोरांनी सांगितले की ते राजधानी दमास्कसला वेढा घालत आहेत. असद २००० साला पासून येथे राज्य करत आहेत. शनिवारी रात्रीच बंडखोरांनी होम्स शहर ताब्यात घेतले. हे एक मोक्याचे शहर आहे. त्यामुळे दमास्कसचा संपर्क भूमध्य सागरी किनाऱ्यापासून तुटला आहे.
सैन्याकडून फार कमी प्रतिकार झाला
राष्ट्राध्यक्ष असद यांच्या सरकारच्या हकालपट्टीची मागणी करणाऱ्या सशस्त्र विरोधी गटांनी २७ नोव्हेंबर रोजी सीरियातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे शहर अलेप्पोवर हल्ला चढवला. यानंतर बंडखोरांनी हमा शहर ताब्यात घेतले. येथे सरकारी सैन्याकडून फार कमी प्रतिकार झाला.
बंडखोर गटांचे नेतृत्व इस्लामवादी गट हयात तहरीर अल-शाम (एचटीएएस) करत आहे. त्याचा उगम अल-कायदापासून झाला. अमेरिका आणि संयुक्त राष्ट्रांनी याला दहशतवादी संघटना घोषित केले आहे. एचटीएएसचे प्रमुख अबू मोहम्मद अल-जुलानी यांच्यावर मानवाधिकारांचं उल्लंघन केल्याचे आरोप होत आहेत. बंडखोरांचे आक्रमण आणि असदच्या पूर्वीच्या मित्रपक्षांचा पाठिंबा नसल्यामुळे लढाईच्या सुरुवातीपासूनच असदच्या राजवटीला गंभीर धोका निर्माण झाला आहे. राजधानी दमास्कसवरही बंडखोरांनी ताबा मिळवला आहे.
सीरियावर गेल्या पाच दशकांपासून असद घराण्याची सत्ता
असद कुटुंबाने सीरियावर पाच दशकांहून अधिक काळ राज्य केले आहे. अध्यक्ष बशर अल-असद यांनी २००० मध्ये त्यांचे वडील हाफेज असद यांच्या निधनानंतर सत्ता हाती घेतली. असद यांनी आपल्या विरोधात उठलेला आवाज दाबण्यासाठी बळाचा वापर केला. त्यांच्या राजवटीत ३.५०लाखांहून अधिक विरोधकांचा मृत्यू झाला. तसेच विरोधकांना तुरुंगात टाकले. अगदी बंदी असलेल्या नर्व गॅसचा वापर विरोधकांच्या ताब्यात असलेल्या भागात करण्यात आला.
२०११ मध्ये सीरियामध्ये असद यांच्या विरोधात निदर्शने सुरू झाली. हे थांबवण्यासाठी असद यांनी कठोर कारवाई केली. यातून गृहयुद्ध सुरू झाले. २०१५ पर्यंत, विरोधी गट आणि इस्लामिक स्टेटच्या अतिरेक्यांनी सीरियाचा मोठा भाग ताब्यात घेतला होता. रशियन लष्करी हस्तक्षेपामुळे असद यांची सत्तेवरील पकड मजबूत झाली होती.