सार

अधिक नफा कमवण्याच्या हेतूने शेअर बाजारामध्ये गुंतवणूकदारांची संख्या वाढत आहे. या बाजाराकडे नव्याने आकर्षित होणार वर्गदेखील मोठ्या प्रमाणात आहे. नवीन गुंतवणूकदारांनी आर्थिक गणिते समजून घेऊन आणि काही बाबतीत दक्षता घेऊनच या क्षेत्रात उतरणे अपेक्षित आहे.

Mumbai I सध्या भारतामध्ये शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. २०१५ च्या आर्थिक वर्षानंतर या संख्येत लक्षणीय वाढ होत आहे. नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या एका अहवालानुसार भारतीय शेअर बाजारात ३१ जानेवारी २०२४ पर्यंत ८ कोटी ७० लाख गुंतवणूकदार आहेत. आर्थिक जोखीम घेत बाजारात गुंतवणूक करून अनेकजण नफा कमवत आहेत. तर शेअर बाजाराकडे एक पूर्णवेळ करिअर म्हणूनदेखील पहिले जात आहे.

बाजारातील चढ उतारावर नफा तोटा अवलंबून

शेअर बाजारातील गुंतवणूक जोखमीचे असते. अनेकदा बाजारातील चढ उतारामुळे नफा तसेच तोटादेखील होत असतो. याच अनुषंगाने गुंतवणूक करताना काही गोष्टींची काळजी घेतल्यास नुकसान टळू शकते. तुम्ही जर शेअर बाजाराकडे पार्ट टाइम किंवा फुल टाइम करिअर म्हणून पाहत असाल तर खालील गोष्टींची काळजी जरूर घ्यायला हवी.

नवीन गुंतवणूकदारांसाठी टिप्स :

  1. शेअर बाजारात गुंतवणूक करण्यापूर्वी आर्थिक ध्येय निश्चित करणे अत्यंत आवश्यक आहे. तुम्ही पैसे कुठे, कधी आणि का गुंतवणार आहात? किती पैसे वाचवणार आहात यांविषयी तुमच्याकडे स्पष्टता असायला हवी. यामुळे तुम्हाला किती काळासाठी किती पैसा गुंतवायचा आहे हे समजणे सुलभ होईल.
  2. तुम्ही कोणत्या प्रकारचे गुंतवणूकदार आहेत याचा अभ्यास करा. शेअर बाजारामध्ये सामान्यतः व्हॅल्यू इन्व्हेस्टर आणि ग्रोथ इन्व्हेस्टर असतात. व्हॅल्यू इन्व्हेस्टर हे कंपनीचा अभ्यास करून जोखीम घेतात. तर ग्रोथ इन्व्हेस्टर हे रॅट रेसमध्ये शामिल होतात आणि इतरांचे अनुकरण करून गुंतवणूक करतात.
  3. शेअर बाजारात गुंतवणुकीसाठी वयाची अट नसली तरी याचा परिणाम थेट आर्थिक स्थितीवर होऊ शकतो. तुम्ही तरुण असाल तर शेअर बाजारात गुंतवणुकीची मोठी जोखीम उचलू शकता. मात्र तुमचे वय जास्त असेल किंवा तुम्ही वृद्ध असाल तर अशावेळी काळजीपूर्वक गुंतवणूक करावी. यासाठी थेट गुंतवणूक करण्याऐवजी तुम्ही म्यूचुअल फंडच्या माध्यमातून गुंतवणूक करू शकता.
  4. तुम्ही शेअर बाजारात ट्रेडर म्हणून उतरणार आहेत कि गुंतवणूकदार म्हणून उतरणार आहेत याची स्पष्टता तुम्हाला हवी. ट्रेडिंग हि कमी कालावधीसाठी असून जास्त जोखमीची असते तर गुंतवणूक हि विशिष्ट कालावधीसाठी असून ती जास्त नफा देणारी असते.