राज्यात सोमवारीही मुसळधार पावसाची शक्यता, अनेक ठिकाणी शाळांना सुट्टी

| Published : Jul 22 2024, 12:03 PM IST

Heavy Rains In Maharashtra

सार

Maharashtra Rain Updates : कोकण, पश्चिम महाराष्ट्रासह विदर्भातही पावसाने दमदार हजेरी लावल्याने काही प्रमाणात जनजीवन विस्कळीत झाले आहे. पूर्व विदर्भात सोमवारीही मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

 

Maharashtra Rains Updates : राज्यात मागील काही दिवसांपासून पावसाने दमदार हजेरी लावली आहे. कोकण, पश्चिम महाराष्ट्रासह विदर्भातही पावसाने दमदार हजेरी लावल्याने काही प्रमाणात जनजीवन विस्कळीत झाले आहे. पूर्व विदर्भात सोमवारीही मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, भंडाऱ्यातील शाळा, महाविद्यालयांना सोमवारी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. नागपूर आणि गडचिरोली जिल्ह्यासाठी सोमवारी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. राज्यात ठिकठिकाणी देण्यात आलेल्या मुसळधार पावसाच्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर स्थानिक प्रशासन सतर्क झाले आहे.

भंडारा जिल्ह्यात मुसळधार पाऊस

भंडारा जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. पवनी तालुक्यात मुसळधार पावसाने अक्षरश: झोडपून काढले. त्यामुळे आसगावातील अनेक घरांमध्ये हे पावसाचं पाणी शिरलं. गावाला अक्षरशः तलावाचं स्वरूप आले आहे. तर घरात अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याकरिता जिल्हा शोध आणि बचाव पथक आसगाव येथे पोहोचलेला आहे. लाखांदूर तालुक्यातील ओपरा या गावातही घरांमध्ये पाणी शिरले आहे. तसचं या भागात शेतीचंही मोठं नुकसान झाले आहे. दरम्यान सोमवारी भंडाऱ्या जिल्ह्यातील शाळांना सुट्टी देण्यात आली आहे.

सांगलीत मुसळधार पाऊस

सांगलीतही मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे सांगली कोल्हापूरला जोडणार वारणा नदीवरील पूल पाण्याखाली गेला आहे. वारणा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. तर कार्वे, ढगेवाडी जक्राईवाडी आणि डोंगरवाडी येथील तलाव्याच्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. शिराळा परिसरात आणि चांदोली पाणलोट क्षेत्रात पडत असलेल्या दमदार पावसामुळे नदीला पूर आला आहे. वारणा नदीवरील जुना चिकुर्डे ते वारणा नगर पुल तीन दिवस पाण्याखाली गेला असून सध्या या पुलावरून चार ते पाच फूट पाणी आहे.

पंचगंगा नदीच्या पातळीत वाढ, प्रशासन सतर्क

कोल्हापूर जिल्ह्यात पंचगंगा नदीने इशारा पातळीकडे आपली वाटचाल केली आहे. सध्या पंचगंगा नदीची पाणी पातळी ही 38 फूट 10 इंच इतकी पोहोचली आहे. जिल्ह्यातील 84 बंधारे पूर्णपणे पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यात 1 महिन्यात 400 मिलिमीटर पावसाची नोंद

धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यात गेल्या वर्षी दुष्काळामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. तर यंदा गेल्या एक महिन्यापासून होत असलेल्या दमदार पावसामुळे शिंदखेडा तालुक्यातील शेतांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचले आहे. यामुळे पिकांचे नुकसान होण्याची भीती शेतकऱ्यांना सतावत आहे. शिंदखेडा तालुक्यात एका महिन्यात तब्बल 400 मिलिमीटर इतकी पावसाची नोंद करण्यात आली आहे. तर गेल्या वर्षी जुलै महिन्यात 100 मिलिमीटरच्या आतच पाऊस झाला होता. अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे. शिंदखेडा तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करून सरसकट पंचनामे करण्याची मागणी आता शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे. गेल्या वर्षी दुष्काळामुळे पिकांचे नुकसान झाले होते तर यंदा अतिवृष्टीमुळे पिके सडून जाऊ लागली आहेत. यामुळे पुढील काही दिवसात शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची देखील वेळ येऊ शकते. या पार्श्वभूमीवर शासनाने त्वरित पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी आता शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे.

आणखी वाचा :

कोकणात तुफान पाऊस, जगबुडी, कुंडलिका, वशिष्टी नद्यांनी ओलांडली धोक्याची पातळी