सार
Dagdusheth Ganpati Live Darshan: पुण्यातील प्रसिद्ध आणि मानांच्या गणेशोत्सव मंडळांपैकी एक असलेल्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणेशोत्सव मंडळाच्या गणपतीच्या दर्शनासाठी भाविकांची दरवर्षी गणेशोत्सवामध्ये भाविकांची मोठी गर्दी असते. या गणेशोत्सव मंडळाचे यंदा 132 वे वर्षे आहे. यावर्षीच्या गणेशोत्सवासाठी मंडळाकडून हिमाचल प्रदेशमधील जटोली शिवमंदिराची प्रतिकृती साकारण्यात आली आहे.
घरबसल्या दगडुशेठ गणपतीचं दर्शन कसे घ्याल?
श्रींचे ऑनलाईन दर्शन घेण्याची व्यवस्था देखील ट्रस्टने केली आहे. ट्रस्टच्या वेबसाईट, फेसबुक, यू ट्यूब, ट्ट्विटर या माध्यमांद्वारे तुम्ही दगडुशेठ गणपतीचं उत्सवकाळात घरबसल्या दर्शन घेऊ शकता.
फेसबुक
facebook.com/dagadushethganpati
इंटाग्राम
instagram.com/dagadushethganpati
वेबसाईट
dagdushethganpati.com
यंदाच्या देखाव्यात काय?
आशियातील सर्वात उंच शिवमंदिर म्हणून जटोली मंदिर ओळखले जाते. उत्तुंग हिमालयाच्या सानिध्यात प्रतिष्ठित आणि अत्यंत पवित्र असलेल्या मंदिराची तेजस्वी प्रतिकृती दगडूशेठ हलवाई गणेशोत्सव मंडळाने यावर्षी गणेशोत्सवामध्ये साकारली आहे. हे मंदिर स्थापत्यकलेचा चमत्कार आहे. भगवान शिवाच्या सर्वात प्राचीन मंदिरांपैकी एक असून हे मंदिर एकेकाळी भगवान शंकराचे विश्रामस्थान होते असे मानले जाते. या गणेशोत्सवात साकारण्यात आलेल्या जटोली शिवमंदिराच्या प्रतिकृतीचा आकार 125 फूट लांब, 50 फूट रुंद आणि 100 फूट उंच असणार आहे. मंदिराची प्रतिकृती फायबरमध्ये उभारण्यात आली असून त्यावर रंगकाम करण्यात आले आहे. मुख्य सभामंडपातील खांबांची रचना सुटसुटीत असून भाविकांना लांबून सहजतेने श्रींचे दर्शन घेता येईल.
31 हजार महिलांचे अर्थवशीर्ष पठण
8 सप्टेंबर म्हणजे रविवारी रोजी पहाटे 6 वाजता ॠषिपंचमीनिमित्त दरवर्षीप्रमाणे 31 हजार महिला सामुदायिकरित्या अथर्वशीर्ष पठण करणार आहेत. यावेळी ज्येष्ठ साहित्यिक डॉ. अरुणा ढेरे उपस्थित राहणार आहेत. रात्री 10 ते 12 वाजेपर्यंत हरी जागर च्या माध्यमातून महाराष्ट्रातील वारकरी बंधू वारकरी गजर करीत गणरायाचरणी सेवा अर्पण करणार आहेत. उत्सवांतर्गत सूर्यनमस्कार, अग्निहोत्र, वेदपठण, महिला हळदीकुंकू असे विविध कार्यक्रम होणार आहेत. दररोज पहाटे 5 पासून महाअभिषेक पूजा होणार असून सकाळी 8 ते दुपारी 12 यावेळेत मिलींद राहुरकर शास्त्री हे गणेशयाग आणि दुपारी 12 ते 4 यावेळेत दाक्षिणात्य पद्धतीने नटराजशास्त्री यांच्या उपस्थितीत गणेशयाग होणार आहे. भाविकांना स्वहस्ते अभिषेक पहाटे 5 ते सायंकाळी 5 यावेळेत मंडपात करता येणार आहेत.
विसर्जन मुरवणूक कधी?
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणेशोत्सव मंडळाच्या श्रीची विसर्जन मिरवणुकीत यावर्षी ही दुपारी ४ वाजता निघणार आहे. पुण्याच्या गणेश विसर्जन मिरवणुकीचे मुख्य आकर्षण असलेला दगडूशेठ गणपती बाप्पा हे विसर्जन मिरवणुकीत रात्री सहभागी होतात. पण मागील वर्षाप्रमाणे यंदा देखील परंपरेप्रमाणे विसर्जन मिरवणुकीत रात्री सहभागी न होता दगडूशेठ गणपती दुपारी चार वाजता मिरवणुकीत सहभागी होणार आहे.
आणखी वाचा :
घरबसल्या एका क्लिकवर घ्या लालबागच्या राजाचे दर्शन!