सार

फायबरयुक्त फळे रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यास, पचन सुधारण्यास आणि वजन कमी करण्यास मदत करतात. पेरू, पपई, केळी, सफरचंद, नाशपाती, संत्री आणि अननस ही फायबरयुक्त फळे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहेत.

फायबरयुक्त खाद्य पदार्थ खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत होते, ज्यामुळे मधुमेह नियंत्रणात ठेवता येतो. याशिवाय, फायबर पचन सुधारते, बद्धकोष्ठतेपासून आराम देते आणि आतड्यांच्या आरोग्यासाठी उपयुक्त ठरते. फायबरयुक्त आहार पोट लवकर भरतो, ज्यामुळे भूक कमी लागते आणि खाण्याचे प्रमाण नियंत्रित राहते. हे वजन कमी करण्यासही मदत करते. चला, अशा काही फळांबद्दल जाणून घेऊया, ज्यामध्ये फायबर मुबलक प्रमाणात असते.

१.पेरू

मध्यम आकाराच्या पेरूमध्ये सुमारे ५ ग्रॅम फायबर असते. व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्सने भरलेला पेरू रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करतो.

२.पपई

पपई फायबरचा उत्तम स्रोत आहे. एका छोट्या पपईत सुमारे २.५ ग्रॅम फायबर असते. यामध्ये असलेला पपेन पचनक्रिया सुधारण्यास मदत करतो.

आणखी वाचा- गरम पाणी पिल्यामुळे वजन कमी होत का, पाणी पिण्याची पद्धत जाणून घ्या

३.केळे

केळीमध्ये देखील फायबर भरपूर प्रमाणात असते. एका मध्यम आकाराच्या केळीमध्ये सुमारे ३ ग्रॅम फायबर असते. पोटॅशियमने समृद्ध केळे उच्च रक्तदाब कमी करण्यास आणि हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरते.

४.सफरचंद

सफरचंदामध्ये देखील फायबर भरपूर प्रमाणात असते. मध्यम आकाराच्या सफरचंदामध्ये सुमारे ४ ग्रॅम फायबर असते.

५.नाशपाती

नाशपाती फायबरने समृद्ध असते. कमी कॅलरी असलेले हे फळ वजन कमी करण्यासाठी एक चांगला पर्याय आहे.

६.संत्रे

संत्र्यामध्ये देखील फायबर चांगल्या प्रमाणात असते. मध्यम आकाराच्या संत्र्यामध्ये सुमारे ३ ग्रॅम फायबर असते. व्हिटॅमिन सीने समृद्ध संत्रे रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास आणि त्वचेच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरते.

आणखी वाचा- मूग डाळीचा हलवा १० मिनिटांत बनवा; जाणुन घ्या रेसिपी

७.अननस

अननसामध्ये फायबर चांगल्या प्रमाणात असते. एका अननसामध्ये सुमारे २.३ ग्रॅम फायबर असते. पचन सुधारण्यासाठी अननस खाणे फायदेशीर ठरते

महत्त्वाचे: कोणत्याही आहारामध्ये बदल करण्यापूर्वी आरोग्य तज्ञ किंवा आहारतज्ञांचा सल्ला घ्या.