Health News : महिलांनो कितीही बिझी असाल तरी ‘ही’ आसने कराच

| Published : Apr 17 2024, 07:00 AM IST

5 Yoga poses to get rid of Stress and relax your mind

सार

महिलांमध्ये थकवा येणे, हिमोग्लोबिनची कमतरता, मासिक पाळीचे चक्र बिघडणे, अंगदुखी अशा एक ना अनेक तक्रारी सध्या मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. या समस्या उद्भवू नयेत यासाठी भारतीय योगामध्ये काही खास आसने आहेत.जाणून घ्या सविस्तर

दैनंदिन जीवनात आपण इतके व्यग्र असतो की स्वत:च्या अनेक गोष्टींकडे लक्ष द्यायला आपल्याला वेळही मिळत नाही. विशेषत: महिला वर्गाचे स्वत:कडे जास्त दुर्लक्ष होत असल्याचे दिसते. घरातील सर्व जबाबदाऱ्या, मुलांकडे लक्ष देणे, ऑफीसचे ताण यामध्ये त्यांचे आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष होते. अशामध्ये अनेकदा सकाळचा नाष्ता चुकवणे, व्यायामाचा अभाव, जंक फूडचे सेवन, झोपेची कमतरता या तक्रारी प्रामुख्याने असतात. त्यामुळे महिलांमध्ये थकवा येणे, हिमोग्लोबिनची कमतरता, मासिक पाळीचे चक्र बिघडणे, अंगदुखी अशा एक ना अनेक तक्रारी दिसून येतात. या समस्या उद्भवू नयेत यासाठी भारतीय योगामध्ये काही खास आसने आहेत. मात्र यासाठी आपल्या व्यग्र जीवनशैलीतून वेळ काढणे आवश्यक आहे. ही आसने महिलांनी नियमित केल्यास त्यांना निश्चितच फायदा होऊ शकतो. पाहूयात कोणत्या आसनांचा नेमका काय फायदा होतो…

बलासन :

शरीरावर वाढलेली चरबी घटवण्यासाठी हे एक उत्तम आसन आहे. पाय गुडघ्यात वाकवून बसावे. त्यानंतर डोके जमिनीला टेकवण्याचा प्रयत्न करावा. हे करताना पार्श्वभाग टाचांना चिकटलेला राहील याची काळजी घ्यावी. त्यानंतर हात डोक्याला लागून पुढच्या बाजूला जमिनीला समांतर ठेवावेत. या स्थितीत जास्त काळ राहील्यास त्याचा आरोग्याच्या अनेक समस्या दूर होण्यास मदत होते. शरीर लवचिक होऊन पाठीच्या तक्रारी दूर होतात. सुरुवातीला हे आसन टिकवण्यास वेळ लागतो मात्र त्यानंतर हळूहळू जमायला लागते.

अधोमुख श्वानासन :

हे आसन करताना हात आणि पायाचे तळवे जमिनीला टेकलेले असावेत. श्वास सोडत कंबर वर घेण्याचा प्रयत्न करावा. खांदे आणि कोपर यांतील अंतर समान राहीला असे पहावे. हे अंतर कंबरेच्या अंतराइतके असेल असे पहावे. शरीर जमिनीला समांतर राहील अशाप्रकारे कंबर खाली करावी त्यानंतर पुन्हा वर उचलावी. असे किमान १० वेळा करावे. यामुळे शरीरातील रक्ताभिसरण क्रिया चांगली होते तसेच शरीराच्या वरच्या भागाची ताकद वाढण्यास मदत होते.

विरभद्रासन :

हे उभे राहून करायचे आसन आहे. दोन्ही पायात पुरेसे अंतर घ्या. त्यानंतर एका बाजूला कंबर वळवून त्या बाजूच्या गुडघ्यात वाका. दोन्ही हात वर घेऊन हाताचा नमस्कार घाला. असेच दुसऱ्याही बाजूना करा. सगळे अवयव समांतर स्थितीत राहतील असा प्रयत्न करा. हात आणि पायांची ताकद वाढण्यासाठी या आसनाचा चांगला उपयोग होतो. तसेच शरीरातील महत्त्वाचे स्नायू बळकट होण्यास मदत होईल. पायाचे सांधे बळकट होण्यास मदत होते.

उत्कटासन :

हे आसन करताना प्रथम दंडस्थिती घ्यावी. मग सावकाश गुडघ्यातून वाकत बसल्यासारखी स्थिती घ्यावी. यावेळी श्वास सोडत खाली जावे. बैठक स्थितीत गुडघे दुमडून बसावे. आपण शौचाला जसे बसतो त्या पद्धतीने बसावे. त्यावेळी गुडघ्यांवर ताण येतो. ज्यांना असा ताण सहन होत नाही त्यांनी ही पूर्वस्थिती लगेच सोडावी म्हणजेच श्वास घेत घेत वर दंडस्थितीत यावे. काही दिवस पूर्वस्थितीचा सराव करावा. एकदा गुडघे दुमडून खाली टाचांवर बसता येऊ लागले की आसनातील पुढच्या स्थितीचा अभ्यास करता येतो. या आसनामुळे कंबरदुखी दूर होण्यास मदत होते. तसेच आसनामुळे गॅसेसचा त्रास कमी होतो. हात-पाय मजबूत होतात.