सार
बरेचदा आपण चेहऱ्याची जेवढी काळजी घेतो तेवढी काळजी पायांच घेतली जात नाही. त्यामुळे बरेच जणांना पायांच्या भेगांची समस्या जाणवते. जर वेळीच लक्ष दिलं नाहीतर ही समस्या वाढूही शकते. काही जणांना फुटलेल्या भेगांची समस्या बाराही महिने जाणवते.
Cracked Heel Causes and Remedies : फुटलेल्या टाचांच्या समस्येमागे अनेक कारणं असू शकतात. जसं वेळीच पायांकडे लक्ष न देणं, हिल्सच्या चपलांचा वापर, अनियमित खाणंपिणं, व्हिटॅमीन ई ची कमतरता, कॅल्शियम आणि आर्यनची कमतरता यामुळेही हा त्रास होतो. खरंतर या समस्येसाठी बाजारात अनेक क्रीम्स तुम्हाला मिळतील. पण यासाठी जितके घरगुती उपाय करू तेवढे चांगले आणि सोपेही आहेत.
- सर्वात सोपा उपाय म्हणजे आपल्या प्रत्येकाकडे घरी नारळाचं तेल किंवा केसांसाठी खोबरेल तेल हे असतंच. रात्री झोपण्याआधी एक मोठा चमचा नारळाचं तेल टाचांना लावा. थोडं गरम करून लावल्यास उत्तमच ठरेल. काश्याची वाटी असल्यास तेल लावल्यावर हलका मसाज करावा. तेल अंथरूणाला लागू नये म्हणून मोजे घालून झोपा. सकाळी सावकाश उठून पाय पाण्याने धुवून टाका. नाहीतर उगाच पडायला व्हायचं. हा उपाय साधारण 10 दिवस करून पाहा. तुम्हाला नक्कीच फरक पडलेला दिसेल. तुम्हाला उष्णतेचा त्रास असल्यासही तुम्ही हा उपाय करू शकता. खोबरेल तेलाच्या ऐवजी ऑलिव्ह तेल, कॅस्टर ऑईल म्हणजेच एरंडेल तेलाचा किंवा जोजोबा तेलाचा वापरही करू शकता. पण साधारण सर्वांकडे खोबरेल तेल असतंच. त्यामुळे ते वापरणं अधिक सोपं पडतं.
- पायांच्या भेगांसाठी अजून एक सोपा पण जास्त माहीत नसलेला उपाय म्हणजे गुलाबपाणी आणि ग्लिसरीनचा वापर होय. या दोन्ही गोष्टींच्या वापराने पायाला मऊपणा येतो. 3/4 गुलाब पाण्यात 1/4 ग्लिसरीन मिक्स करा आणि ते फुटलेल्या पायांवर लावा. काही मिनिटं ठेवून कोमट पाण्याने धुवून टाका.
- मधाचा वापर बहुतेकदा चेहऱ्यासाठी फेसपॅक बनवताना केला जातो. पण तुम्ही पायांच्या समस्येसाठीही मधाचा वापर करू शकता. एका बादलीत पाणी घेऊन त्यात अर्धा कप मध घाला. या पाण्यात काही वेळ पाय बुडवून ठेवा. किमान 20 मिनिटं तरी पाय बुडवा. नंतर पाय मऊ कापडाने पुसून घ्या. हा उपाय प्रत्येकाला करणं शक्य होईलच असं नाही. कारण अर्धा कप मधाचा वापर करणं प्रत्येकाला जमेलचं असं नाही. पण हा उपायही फुटलेल्या पायांसाठी उपायकारक आहे.
- तुमचं काम जर मातीशी निगडीत असेल तर पायांची स्वच्छता राखणं आवश्यक आहे. त्यामुळे सॉक्सचा वापर करा किंवा कामाला जाताना शूजचा वापर करा. जर तुम्हाला उष्णतेचा त्रास असेल तर त्याचाही परिणाम पायांच्या भेगा स्वरूपात दिसून येतो. फुटलेल्या टाचांचा त्रास जास्तच जाणवू लागल्यास वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
(Disclaimer : सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)
आणखी वाचा :