Who is Sita Shelke: कोण आहेत सीता शेळके?, का आल्यात चर्चेत? जाणून घ्या

| Published : Aug 04 2024, 08:06 PM IST

sita shelke

सार

Who is Sita Shelke: केरळच्या वायनाड जिल्ह्यात भूस्खलनात देवदूत म्हणून पुढे आलेल्या मेजर सीता शेळके आहेत तरी कोण? मेजर सीता शेळके कार्याचा आढावा थोडक्यात जाणून घेऊयात.

 

Who is Sita Shelke: केरळच्या वायनाड जिल्ह्यात भूस्खलन होऊन 300 हून अधिक लोकांचा जीव गेला. तर शेकडो लोक बेपत्ता झाले. जखमींचीही संख्या मोठी आहे. भूस्खलन झाल्यानंतर मुसळधार पावसात बचाव कार्य सुरू आहे. भारतीय लष्कराची एका तुकडीने 190 फुटांचा पूल तयार करून बचाव कार्यात मोलाची जबाबदारी पार पाडली. मद्रास इंजिनिअर ग्रुप (MEG) या पथकाने केवळ 31 तासात मातीचा ढिगारा, मुळापासून उखडलेली झाडे बाजूला सारत वाहत्या नदीवर चुराल्लमाला ते मुंदाक्काई या दोन गावांना जोडणाऱ्या पुलाचे निर्माण केले. या पथकात मराठमोळ्या मेजर सीता शेळके या एकमेव महिला अधिकारी होत्या. इतर जवानांप्रमाणेच त्या बचाव कार्यात न थकता, न थांबता अथक परिश्रम घेताना दिसत आहेत.

कोण आहेत सीता शेळके?

मेजर सीता अशोक शेळके या मुळच्या महाराष्ट्राच्या अहमदनगर जिल्ह्यातील गाडीलगावच्या आहेत. लष्कराच्या बंगळुरूमधील ‘मद्रास इंजिनिअरिंग ग्रुप’मधील 70 जवानांच्या पथकातील त्या एकमेव महिला अधिकारी आहेत. मद्रास सॅपर्स या नावाने ओळख असलेले हे पथक लष्करासाठी पूल तयार करण्याचे काम करते. युद्धादरम्यान तात्पुरते रस्ते तयार करणे, भूसुरुंग शोधून तो नष्ट करणे, अशी कामे या पथकाकडून केली जातात. तसेच नैसर्गिक आपत्ती आली असताना बचाव कार्यातही हे पथक योगदान देते.

सीता शेळके यांच्या नेतृत्वात बेली ब्रिजची उभारणी

बेली ब्रिजचे बांधकाम 31 जुलैच्या रात्री सुरू करण्यात आले होते आणि 1 ऑगस्टला संध्याकाळी 5 पर्यंत हा ब्रिज तयार झाला. 19 स्टील पॅनेल वापरून बनवलेल्या हा पूल सिंगल पिलरच्या आधारे उभा करण्यात आला आहे. ब्रिजच्या परीक्षणासाठी लष्कराने आधी त्यांच्या वाहनाद्वारे यावरून वाहतूक करून त्याची चाचणी घेतली आहे. त्यानंतर तो इतरांनाही वापरण्यासाठी खुला करण्यात आला आहे.

'मला फक्त महिला समजू नका, मी सैनिक आहे'

प्रसार माध्यमांशी बोलताना मेजर सीता शेळके यांनी म्हटले, मी एकमेव महिला अधिकारी येथे आहे, असे अजिबात समजू नका. मी सैनिक आहे. मी इथे भारतीय लष्कराचे प्रतिनिधित्व करत आहे आणि मी या बचाव कार्यात काम करणाऱ्या पथकाचा एक भाग आहे, याचा मला अभिमान वाटतो. मेजर सीता शेळके आणि त्यांच्या पथकाने विक्रमी वेळेत नदीवर पूल बांधल्यामुळे वायनाडमधील बचाव कार्याला वेग आला आहे. भूस्खलनग्रस्त लोकांना सुरक्षित ठिकाणी हलविणे यामुळे सोपे झाले.

मेजर सीता शेळके यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल

मेजर सीता शेळके यांचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. सोशल मीडिया यूझर त्यांचे कौतुक करत आहेत. आमदार सत्यजित तांबे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत मेजर सीता शेळके यांच्या शौर्याला सलाम केली आहे.

 

 

आणखी वाचा : 

Waynad landslide: चमत्कार! 40 दिवसांची मुलगी व 6 वर्षीय मुलगा पुरात सापडले जिवंत