दिलासादायक! सरासरीपेक्षा जास्त पाऊस ; एल निनो, ला-निनाचा कसा परिणाम?

| Published : Apr 16 2024, 05:03 PM IST / Updated: Apr 16 2024, 05:05 PM IST

Rain update

सार

भारतीय हवामान विभागानं सोमवारी दीर्घकालीन हवामान अंदाज वर्तवला आहे . त्यानुसार यंदा संपूर्ण देशभरात नैऋत्य मान्सूनच्या काळात सरासरीपेक्षा जास्त पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.जाणून घ्या काय बोले हवामान विभागाचे मुख्य संचालक डॉ. मृत्युंजय महापात्र.

यंदा र्नैऋत्य मोसमी पावसाच्या दमदार सरी बरसणार आहेत. एक जून ते ३० सप्टेंबर, या पावसाळ्याच्या चार महिन्यांत देशात सरासरीपेक्षा जास्त म्हणजे १०६ टक्के पाऊस पडण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

हवामान विभागाचे महासंचालक डॉ. मृत्युंजय महापात्रा यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. ते म्हणाले की, जगभरातील स्थिती मोसमी पावसाला पोषक आहे. त्यामुळे यंदाच्या पावसाळ्यात र्नैऋत्य मोसमी पाऊस सरासरीपेक्षा जास्त, १०६ टक्के पडण्याचा अंदाज आहे. प्रशांत महासागरात सध्या एल-निनो सक्रिय असून, तो मध्यम अवस्थेत आहे. जूनच्या सुरुवातीपर्यंत एल-निनो निष्क्रिय स्थितीत जाईल आणि ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये ला-निना सक्रिय होईल. हिंद महासागर द्विध्रुविता सध्या निष्क्रिय आहे, तो जूनच्या सुरुवातीस सक्रिय होईल. युरोप आणि आशिया बर्फाच्छादित क्षेत्र मार्च-एप्रिलमध्ये सरासरीपेक्षा कमी राहिले, ही सर्व स्थिती र्नैऋत्य मोसमी पावसासाठी पोषक आहे. त्यामुळे सरासरीपेक्षा जास्त पावसाची शक्यता आहे.

‘लानिना’त चांगला पाऊस पडण्याची शक्यता : 

  • ला-निनाच्या काळात आजवर सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडल्याचे निरीक्षण आहे. १९७४ ते २००० या काळात २२ वेळा ला-निना स्थिती सक्रिय होती.
  • या २२ वर्षांत मोसमी हंगामाच्या सुरुवातीस एल-निनो स्थिती जाऊन, ला-निना स्थिती आल्याची घटना नऊ वेळा झाली आहे.
  • ला-निना काळात र्नैऋत्य मोसमी पाऊस सरासरी वेळेत केरळमध्ये दाखल होऊन, सरासरी वेळेत देशभरात पोहोचतो.

एल निनो म्हणजे काय?

एल-निनो ही प्रशांत महासागरात तयार होणारी एक वातावरणीय स्थिती आहे. प्रशांत महासागराच्या पाण्याचं तापमान जेव्हा नेहमीपेक्षा जास्त वाढतं, तेव्हा त्या स्थितीला ‘एल-निनो’ असं संबोधलं जातं. प्रशांत महासागरातील पाण्याचं तापमान साधारणपणे 26 ते 27 अंश सेल्सिअसपर्यंत राहतं. त्यात आणखी जास्त वाढ होऊन ते 32 ते 34 अंश सेल्सिअसपर्यंत होऊ शकते, या स्थितीला सुपर एल निनो म्हणतात. वारे वेगानं वाहू लागल्यामुळं समुद्राच्या पाण्याचं तापमान वेगानं कमी होऊ लागतं, त्या स्थितीला ला निना असं म्हटलं जातं. या दोन्ही परिस्थितींचा जगभरातील हवामान किंवा प्रामुख्यानं तापमानावर परिणाम होत असतो.