चालत्या रेल्वेतून मौल्यवान वस्तू पडल्यास घाबरून न जाता ट्रॅकच्या कडेला असलेल्या खांबाचा क्रमांक लिहून ठेवा आणि कोणत्या दोन स्थानकांमध्ये वस्तू पडली ते निश्चित करा.
नवी दिल्ली: चालत्या वाहनातून मोबाईल, पर्स किंवा इतर कोणतीही वस्तू पडल्यास, वाहन थांबवून ती उचलता येते. पण रेल्वे प्रवासात असे करणे शक्य नसते. चालत्या रेल्वेतून मौल्यवान वस्तू पडल्यास काय करावे या प्रश्नाचे उत्तर येथे आहे. तुमची कोणतीही मौल्यवान वस्तू खाली पडल्यास घाबरून न जाता ताबडतोब काही कामे करावीत. असे केल्याने तुमची वस्तू मिळण्याची शक्यता असते. मोबाईलमध्ये बँक तपशील, आवश्यक ओळखपत्राचे छायाचित्र इत्यादी अनेक माहिती साठवलेली असते. चालत्या रेल्वेतून मोबाईल खाली पडल्यास किंवा चोरी झाल्यास चिंता वाढते. डिजिटल जगात तुमची माहितीचा गैरवापर होण्याची शक्यता जास्त असते.
चालत्या रेल्वेतून मोबाईल पडताच प्रवाशांनी सर्वात आधी ट्रॅकच्या कडेला दिसणाऱ्या काळ्या-पिवळ्या खांबाचा क्रमांक लिहून ठेवावा. तसेच कोणत्या दोन रेल्वे स्थानकांच्या मध्ये तुमची वस्तू पडली आहे हे निश्चित करा. यासाठी तुम्ही सहप्रवासी, टीटीई किंवा इतर रेल्वे कर्मचाऱ्यांची मदत घेऊ शकता. तुम्ही प्रवास करत असलेल्या मार्गाची माहिती नसल्यास, Where Is My Train अॅप वापरून रेल्वे स्थानकाची अचूक माहिती मिळवा.
वरील सर्व माहिती गोळा केल्यानंतर रेल्वे पोलीस दलाच्या मदत केंद्राला १८२ किंवा रेल्वे मदत केंद्राला १३९ या क्रमांकावर फोन करून हरवलेल्या वस्तूची आणि तिची संपूर्ण माहिती द्यावी. त्यानंतर तुम्ही गोळा केलेली माहिती देखील द्यावी. तुमच्या रेल्वेतील आरपीएफ कर्मचाऱ्यांसोबतही ही माहिती शेअर करावी. खांबाच्या क्रमांकाच्या मदतीने पोलिसांना तुमची वस्तू शोधण्यास मदत होईल.
आणीबाणीची साखळी ओढायची का?
छोट्या छोट्या गोष्टींसाठी आणीबाणीची साखळी ओढणे हा गुन्हा आहे. तुमच्यासोबत प्रवास करणारे मूल, वृद्ध व्यक्ती किंवा अपंग व्यक्तीला स्थानकावर सोडून रेल्वे सुरू झाल्यास, अशा परिस्थितीत साखळी ओढता येते. रेल्वेत आग, दरोडा किंवा इतर कोणत्याही आणीबाणीच्या प्रसंगी साखळी ओढता येते.