मुलींना मिळणार 1 लाखांची मदत, ‘ही’ योजना देणार फायदा

महाराष्ट्र सरकार मुलींसाठी 'लेक लाडकी' योजना राबवत आहे. या योजनेअंतर्गत मुलींना 18 वर्षांपर्यंत टप्प्याटप्प्याने एकूण 1 लाख 1 हजार रुपये दिले जातात. पिवळे आणि केशरी शिधापत्रिकाधारक कुटुंबांना या योजनेचा लाभ घेता येतो.

Rameshwar Gavhane | Published : Aug 31, 2024 5:25 AM IST / Updated: Aug 31 2024, 12:17 PM IST

लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र ठरलेल्या महिलाना दरमहा 1500 रुपये दिले जातात. पण त्यापूर्वीच राज्यातील मुलींसाठीही एक योजना सरकारने जाहीर केली होती. या योजनेतून मुलींना घसघशीत रक्कमही मिळते. एखाद्या घरात मुलीने जन्म घेतला तर ती 18 वर्षाची होईपर्यंत तिला 1 लाख 1 हजार रुपये टप्प्याने देण्यात येतात. चला तर मग जाणून घेऊयात या योजनेविषयी सविस्तर माहिती.

लेक लाडकी योजना

राज्य सरकारने महिलांसाठी यापूर्वीही विविध योजना सुरु केल्या आहेत. लाडकी बहिण योजनेपूर्वी ‘लेक लाडकी’ ही योजना सुरु केली होती. मुलीच्या जन्मापासून ती अठरा वर्षाची होईपर्यंत टप्याटप्याने एकूण 1 लाख 1 हजार रुपये रक्कम प्रदान करण्याची ही योजना आहे. पिवळ्या आणि केशरी शिधापत्रिकाधारक कुटुंबात 1 एप्रिल 2023 रोजी किंवा त्यानंतर जन्म झालेल्या कन्येला हे अर्थसहाय्य राज्यसरकारकडून देण्यात येते.

कोणत्या टप्प्यात किती पैसे मिळणार?

मुलीच्या जन्मानंतर पाच हजार रूपये या कुटुंबाला मिळणार आहेत. हीच मुलगी पहिलीत गेली की सहा हजार रूपये मिळतील. सहावीत गेली की सात हजार रुपये मिळणार आहे. तसंच पुढच्या शिक्षणासाठीही सरकारकडून पैसे दिले जातील. ही मुलगी अकरावीत गेली ती आठ हजार रुपये दिले जातील. तर वयाची 18 वर्षे पूर्ण झाल्यावर 75 हजार रूपये सरकारकडून दिले जाणार आहेत.

काय आहेत अटी?

1 एप्रिल 2023 या दिवसानंतर जन्माला येणाऱ्या मुलींसाठी सरकारने विशेष योजना आखली आहे. पिवळ्या आणि केशरी रेशनकार्ड धारक कुटुंबातील मुलींना ही योजना लागू होते. ज्या कुटुंबातील मुलीला या योजनेचा लाभ घ्यायचा आहे. ते कुटुंब महाराष्ट्रातील रहिवासी असणे आवश्यक आहे. तसेच या कुटुंबाचे बँकेत खाते असणे आवश्यक आहे. मुख्य म्हणजे या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 1 लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे. पहिल्या अपत्याच्या तिसऱ्या हफ्त्यासाठी व दुसऱ्या आपत्याच्या दुसऱ्या हफ्त्यासाठी अर्ज सादर करताना माता किंवा पित्याने कुटुंब नियोजन प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य असेल.

असा कसा अर्ज?

तुम्ही जिथे राहता तिथल्या अंगणवाडीत तुम्ही अर्ज करू शकता. या अर्जात वैयक्तिक माहिती भरावी लागेल. मोबाईल नंबर, रहिवासी पत्ता, मुलीची माहिती, बँक खात्याची माहिती देऊन हा अर्ज करता येऊ शकतो.

ही कागदपत्रं लागणार?

या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही कागदपत्रांची पूर्तता करणे आवश्यक आहे.

लाभार्थी मुलीच्या जन्माचा दाखला

कुटुंबाच्या उत्पन्नाचा दाखला

कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेचे प्रमाणपत्र

पालकांचे आधारकार्ड

बँक पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत

रेशनकार्ड ( पिवळे अथवा केशरी रेशन कार्ड- साक्षांकित प्रत)

मतदार ओळखपत्र

लाभार्थीचा शाळेचा दाखला

अंतिम लाभासाठी मुलीचा विवाह झालेला नसणे आवश्यक आहे.

आणखी वाचा :

UPI Payment फसवणूक झाल्यास काय करावे?

 

Share this article